तिस-या अपत्यामुळे सेना उमेदवाराचा अर्ज बाद, सत्र न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:26 AM2017-12-08T00:26:21+5:302017-12-08T00:26:44+5:30
जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला असतानाच भिवंडीत शिवसेनेचे दाभाड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार अशोक शेलार यांना सप्टेंबर २००१ नंतर तिसरे
पडघा : जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला असतानाच भिवंडीत शिवसेनेचे दाभाड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार अशोक शेलार यांना सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहे. शेलार यांनी याविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने हे अपील फेटाळल्याने शेलार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गुरुनाथ जाधव यांनी शेलार यांना तिसरे अपत्य असल्याने त्यांचा अर्ज बाद करावा, याकरिता छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे हरकत घेतली होती. मात्र, या वेळी शेलार यांनी आपले तिसरे अपत्य हे सप्टेंबर २००१ पूर्वीचे असल्याचा जन्माचा दाखला तसेच शाळा सोडल्याचा दाखला असे पुरावे सादर केल्याने जाधव यांची हरकत फेटाळल्याने त्यांनी याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.
शेलार यांच्या तिसºया अपत्याची नोंद ही ग्रामपंचायतीकडे दोनदा आहे. एकदा ती सप्टेंबर २००१ पूर्वीची तसेच २८ फेब्रुवारी २००२ अशी असून अंगणवाडीसेविकेकडील नोंदही २००२ मधील असल्याने यापूर्वीच्या तारखेची खोटी नोंद केल्याचे जाधव यांचे म्हणणे होते. त्यांनी यासंदर्भात पुरावे सादर केल्याने जिल्हा न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी शेलार यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिले होते.
शेलार यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरु वारी न्यायालयानेही शेलार यांचा अर्ज फेटाळला. विशेष म्हणजे शिवसेनेने शेलार यांचा डमी उमेदवार म्हणून त्यांची पत्नी अंजना यांचाच अर्ज भरल्याने न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांचा अर्जही बाद ठरला आहे. या निर्णयाने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला असून आता काय करायचे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
प्रकाश पाटील यांना बसणार फटका?
दाभाड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे निवडणूक लढवत आहेत. मतदारांना जिल्हा परिषद व पंचायत समिती अशी दोन मते देण्याचा अधिकार आहे. मात्र, ऐनवेळी शिवसेनेचा पंचायत समिती उमेदवार रिंगणाच्या बाहेर फेकल्याने साहजिकच याचा फटका मतदानाच्या वेळी पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाच्या जाधव यांची लढत काँगेसच्या देविदास पाटील यांच्याशी होणार आहे.