लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:05 AM2021-06-01T08:05:10+5:302021-06-01T08:05:29+5:30

चोप्राचे प्रकरण उघड झाल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चारजणांची चौकशी समिती नेमली असून, या समितीने पहिल्याचदिवशी अशी १३ बनावट ओळखपत्रे तयार करून लस घेतल्याचे निदर्शनास आणले.

Thirteen fake identity cards prepared for vaccination were found | लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली

लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली

Next

ठाणे : दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे लस घेतल्याचे प्रकरण गाजत असतानाच, अशी आणखी १३ बनावट ओळखपत्रे तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. या ओळखपत्रांच्याआधारे कितीजणांनी लस घेतली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोप्राचे प्रकरण उघड झाल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चारजणांची चौकशी समिती नेमली असून, या समितीने पहिल्याचदिवशी अशी १३ बनावट ओळखपत्रे तयार करून लस घेतल्याचे निदर्शनास आणले.

शनिवारी चोप्राने लस घेतल्यानंतर सुरुवातीला सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. त्यानंतर टीका सुरू झाल्यानंतर तिने ते फोटो काढून टाकले. तसेच चोप्राने आरोप फेटाळले. पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचे चोप्राचे बनावट ओळखपत्र उघड होताच प्रकरणाला गंभीर वळण लागले. या ओळखपत्रावर ठाणे महापालिकेचा लोगा आणि ओम साई आरोग्य केअर प्रा. लि., या संस्थेचे नाव आहे. ही संस्था ग्लोबल व पार्किंग प्लाझा कोविड सेंटरचे काम पाहते. लागलीच आयुक्त डॉ. शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. समितीमध्ये उपायुक्त विश्वनाथ केळकर, डॉ. अनिरुध्द माळगावकर, आरोग्य अधिकारी आणि वर्तकनगर सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांचा समावेश असून, तीन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

चौकशीच्या पहिल्यादिवशीच आणखी १३ बनावट ओळखपत्रे आढळून आली. ही ओळखपत्रे कोणाकोणाच्या नावे तयार केली आहेत, त्या ओळखपत्रांचा गैरवापर करून कितीजणांनी लस घेतली, ही माहिती समितीने दिलेली नाही. आमची माहिती आयुक्तांना सादर केल्या जाणाऱ्या अहवालात नमूद करू, असे समितीमधील सदस्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी बनावट ओळखपत्राद्वारे लस घेतली, त्याबाबत आणखी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. 

Web Title: Thirteen fake identity cards prepared for vaccination were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.