थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची पूर्वीची क्रेझ झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:49 AM2018-12-31T00:49:50+5:302018-12-31T00:50:10+5:30
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांक डून विविध प्लॅन केले जातात. या काळात नागरिकांची पावले हॉटेल्स आणि मॉल्सकडे वळतात.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांक डून विविध प्लॅन केले जातात. या काळात नागरिकांची पावले हॉटेल्स आणि मॉल्सकडे वळतात. त्यामुळे व्यावसायिकांकडून हॉटेल्सची सजावट करून नवा लूक दिला जातो. पण, गेल्या काही वर्षांत ही के्रझ कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मॉल्समध्ये ३१ डिसेंबरचा झगमगाट दिसत असला, तरी हॉटेलमध्ये नावाला सजावट केली आहे. ३१ डिसेंबरचा उत्साह वर्षागणिक कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरांतील मॉल्समध्ये रोषणाई आणि आकर्षक देखावे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. हा झगमगाट ख्रिसमसपासूनच दिसून येत आहे. हॉटेल्सना लायटिंग आणि फुग्यांची सजावट केली आहे. काही हॉटेल्सने स्टिकर्स लावले आहेत. दोनतीन वर्षांपूर्वी हॉटेल्समध्ये लायटिंगचा झगमगाट आणि फुलांची सजावट केली जात होती. पण, यंदा हॉटेल व्यावसायिक फुलांच्या सजावटीपासून दूर असल्याचे दिसत आहे. त्यांची जागा एलईडी लायटिंगने घेतली आहे. सोसायट्यांमध्ये ३१ डिसेंबर सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे जेवणाची मोठ्या प्रमाणात आॅर्डर केली जाते. इतर दिवशी वैयक्तिक आॅर्डर असते. पूर्वी ३१ डिसेंबर मित्रांसोबतच सेलिब्रेट केला जात होता. आता हा ट्रेण्ड बदलून कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा नवा ट्रेण्ड रुजू होऊ लागल्याचे हॉटेल व्यावसायिकांक डून सांगण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापेक्षा सरत्या वर्षाला निरोप द्यायला तरुणाई जास्त उत्सुक असते. त्यामुळे नवीन वर्षापेक्षा ३१ डिसेंबरलाच हॉटेल्स हाऊसफुल्ल दिसतात. नागरिकांचा कल पर्यटनाकडेही जास्त असतो. गोव्यासारख्या पर्यटनस्थळांकडे जाण्याला पर्यटक जास्त पसंती देतात. त्यामुळे स्थानिक हॉटेल्समध्ये किती गर्दी होईल, हे सांगता येणार नाही. दिवसेंदिवस या गर्दीचा ओघ कमी होत असल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले.
प्रकाश शेट्टी यांनी आपल्या हॉटेलला लायटिंग आणि फुग्यांची सजावट केली आहे. ३१ डिसेंबरसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा मेन्यू केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार जो मेन्यू आॅर्डर करतील, तो त्यांना मिळेल. एरव्ही, ३१ डिसेंबरला नॉनव्हेजकडे ग्राहकांचा ओढा जास्त असतो. परंतु, यंदा सोमवार असल्याने व्हेजला जास्त मागणी असणार आहे. यावर्षी शाकाहारी जेवणाची सामग्री मोठ्या प्रमाणात तयार ठेवण्यात येणार आहे.
नित्यानंद पुजारी यांनी ३१ डिसेंबरसाठी वेगळा मेन्यू प्लॅन केला आहे. साधारणपणे या पदार्थांना मागणी असते. त्यामुळे ग्राहक याव्यतिरिक्त कोणत्याही इतर वस्तूंची मागणी करत नाही. ३१ डिसेंबरलाच ग्राहकांची गर्दी जास्त असते. नवीन वर्षात हॉटेल्सकडे फार कुणी येत नाही. यंदा सोमवार आल्याने नॉनव्हेजला फार मागणी असणार नाही. त्यामुळे आॅर्डर कमीच येतील, असे सांगितले.
अजित शेट्टी यांनी यावर्षी व्हेज हॉटेलमध्ये गर्दी जास्त होईल. महाराष्ट्रीयन लोक सोमवार आणि मागशीर्ष महिना असल्याने नॉनव्हेज खाणार नाहीत. ३१ डिसेंबरची के्रझ आता कमी होत आहे. मुंबईतही तिच स्थिती दिसून येईल. नागरिक पर्यटनाला जात असल्याने पूर्वीसारखा व्यवसाय होत नाही. सोसायटीतून येणाऱ्या आॅर्डरचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबीयांसोबत ३१ डिसेंबर साजरा करण्याक डे कल वाढत आहे. प्रेम सिंग यांच्या मते, दोन-तीन वर्षांत हॉटेल व्यवसाय पूर्वीसारखा होत नाही. हॉटेल्सची संख्या वाढल्यामुळेही व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
तरुणाईसाठी प्रबोधनपर कार्यक्रम
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून ३१ डिसेंबरला राष्ट्रप्रेम जागृत करणारा कार्यक्रम संगीत महोत्सवांतर्गत आयोजित केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाईला एक चांगला पर्याय देता यावा, म्हणून तीनदिवसीय महोत्सव केला जातो.
या महोत्सवात कारगिल जवान, विनायक सावरकर, पाणीसंवर्धन आणि जलसंधारण तसेच सैनिकांवरील कार्यक्रम आतापर्यंत घेण्यात आले आहेत. तरुणाईला चांगले पर्याय दिल्यास ते त्याकडे नक्की वळतील, असे संस्थानतर्फे सांगण्यात आले.