स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणीत ठामपाची ५७ व्या स्थानी घसरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 02:52 AM2019-02-17T02:52:36+5:302019-02-17T02:52:53+5:30
केंद्राच्या सर्व्हेत पिछेहाट : प्रशासनासह शिवसेना-भाजपा तोंडघशी
ठाणे : स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या ठाणे महापालिकेचे प्रकल्प हे केवळ कागदावरच असल्याने प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये ठाणे महापालिका थेट ५७ व्या स्थानावर फेकली गेली आहे. यामुळे पालिकेचे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती चांगलीच तोंडघशी पडली आहे
स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महापालिकेने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली असली, तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत मात्र महापालिका सपशेल नापास झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. परंतु, तीन हजार ७०० कोटींच्या क्लस्टर योजनेचा समावेश स्मार्ट सिटीच्या योजनेत केल्याने पालिकेचा क्रमांक घसरल्याचा अजब युक्तिवाद पालिकेच्या घोषणाबाज प्रशासनाने केला आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अंमलबजावणीबाबत यापूर्वीसुद्धा ठाणे महापालिकेचे राज्य शासनाने कान उपटले आहेत.
अनेक योजनांची घोषणा पालिकेकडून होत असली, तरी त्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यात पालिका कमी पडत असल्याचेच या गुणांकावरून दिसून येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी स्मार्ट मिशनअंतर्गत निधी मिळणार असून हे सर्व प्रकल्प प्रगतरपथावर असल्याचा दावा मात्र प्रशासनाकडून केला आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात झालेल्या केंद्राच्या सर्व्हेमध्ये मात्र ठाणे महापालिका थेट ५७ व्या क्र मांकावर फेकली गेली. मात्र, हे सर्वेक्षण अंतिम नसून २५ किंवा २६ फेब्रुवारीला घोषित होणाºया रँकमध्ये पालिका आघाडीवर असेल, असा दावा केला आहे.
मिशनअंतर्गत ४२ प्रकल्पांची आखणी
स्मार्ट सिटीअंतर्गत ४२ प्रकल्पांची आखणी केली असून त्यातील ४१ प्रकल्पांच्या डीपीआरला मान्यता मिळाली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तर, ३८ प्रकल्पांची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली असून या प्रकल्पांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेमध्ये क्लस्टर योजनेचा समावेश केल्याने आणि सर्वाधिक म्हणजे तीन हजार ७०० कोटींचा निधी यासाठी प्रस्तावित असल्याने अंमलबजावणीच्या बाबतीत ७५ टक्के परिणाम क्लस्टर योजनेचा असल्याने हा रँक घसरला आहे.