सोनसाखळी चोरणारी इराणी टोळी गजाआड,२७ गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 08:42 PM2018-01-06T20:42:55+5:302018-01-06T20:46:25+5:30
इराणी टोळी सक्रीय होत असताना, ठाणे पोलिसांच्या भिवंडी युनीटने त्या टोळीचे कंबरडे मोडले आहे. भिवंडीतील इराणी टोळीला अटक केली आहे
ठाणे : सोनसाखळी चोरणा-या इराणी टोळीतील चौघांना ठाणे शहर पोलिसांच्या भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ सोनसाखळी चोरीचे, तर १० गुन्हे पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्धांची फसवणूक करणे, असे एकूण २७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्या गुन्ह्यांतील ४७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी आणि पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध महिला व पुरुषांना लुबाडणारे गुन्हे वाढीस आले होते. त्या गुन्ह्यास आळा घालून ते उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, भिवंडी युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने अब्बास जफर जाफरी (२०, रा. खान कम्पाउंड भिवंडी), मोहमद सर्फराज जाफरी (२३, रा. पिराणीपाडा, भिवंडी), जाफरअली सिराझी ऊर्फ जाफर जाफरी (३३, शांतीनगर भिवंडी) आणि रहेमत अली शैना जाफरी (३१, रा. पिराणीपाडा, भिवंडी) या इराणी टोळीतील चौघांना गजाआड केले. त्यांच्याकडून शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस असलेल्या बतावणीचे १० ते सोनसाखळीचे १७ असे एकूण २७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १३ लाख ३८ हजार ४०० रुपये असल्याची माहिती रानडे यांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील या पथकाने केली.
.........................