दीड लाख ठाणेकरांकडे लॅण्डलाइनसह ब्रॉडबॅण्ड
By Admin | Published: February 23, 2017 05:36 AM2017-02-23T05:36:37+5:302017-02-23T05:36:37+5:30
मुंबई महानगरच्या खालोखाल असलेल्या ठाणे शहराची सातत्याने वाढ होत आहे. त्यातील
सुरेश लोखंडे /ठाणे
मुंबई महानगरच्या खालोखाल असलेल्या ठाणे शहराची सातत्याने वाढ होत आहे. त्यातील प्रत्येकाच्या हातात नवनवीन मोबाइल दिसून येत आहे. मोबाइलच्या जमान्यातही आज दीड लाख ठाणेकरांच्या घरांत आणि कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे लॅण्डलाइन (दूरध्वनी) खणखणत आहेत. ब्रॉडबॅण्डची अत्याधुनिक सेवाही ठाणेकरांना मिळत आहे.
शहरातील कार्यालयांमध्ये लॅण्डलाइनचा वापर होणे, यात नवल नाही; परंतु एमटीएनएल आजही ठाणेकरांच्या पसंतीला आहे. विविध स्वरूपाच्या आॅफर देणाऱ्या शेकडो कंपन्यांच्या गॅलरी शहरात थाटलेल्या आहेत. त्या दररोज लाखो ग्राहकांना नवनवीन मॉडेलचे मोबाइल पुरवत आहेत; पण त्यातही लॅण्डलाइनसाठी नोंदणी करणारे ठाणेकर आजही आहेत. सध्या शहरात एक लाख पाच हजार २४७ दूरध्वनी आहेत, तर ४५ हजार ९३७ ब्रॉडबॅण्ड आणि ४७५ एफटीटीएच सेवा ठाणेकर ग्राहकांना दिली जात आहे, असे दिशा समितीच्या बैठकीत एमटीएनएलने अहवालाद्वारे स्पष्ट केले.
मोबाइल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटरच्या काळात एमटीएनएल ग्राहकांना सेवा देण्यासाठी शहरात आघाडीवर आहे. दूरध्वनी या सेवेबरोबरच ठाणेकरांना उत्तम दर्जाच्या इंटरनेटची हायस्पीड सेवा पुरवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी डिसलॅम नोड्स बसवण्यात आल्याचा दावा एमटीएनएलकडून करण्यात आलेला आहे. आधुनिक तंत्रप्र्रणालीतील एफटीटीएच ही सेवा घरगुती वापरासाठी शहरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्षभरात सुमारे शंभरपेक्षा अधिक इमारतींमध्ये ती दिली जाणार आहे. त्यातील २५ इमारतींमध्ये ही सेवा कार्यरत झाल्याचे सांगितले जात आहे. नव्याने दोन हजार ५०० लॅण्डलाइन जोडण्या देण्याचे नियोजन केले आहे.
ब्रॉडबॅण्ड इंटरनेटच्या अडीच हजार जोडण्या
च्दोन हजार ५०० ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेच्या जोडण्या करणार आहेत. त्यापैकी ७५ पेक्षा जास्त ग्राहकांना ही इंटरनेट सेवा दिली आहे. लॅण्डलाइन सेवा आणि हायस्पीड इंटरनेटची सुविधेच्या विस्तारासाठी सामारीन ग्रुप, दिवा आणि स्प्लेंडोरा येथे नवीन दूरध्वनी केंद्र लवकरच सुरू होणार आहे. एफटीटीएच सेवेच्या मागणीनुसार शहरात नव्याने डिसलॅम नोड्स बसवण्याची तयारी एमटीएनएलने दर्शवली आहे.