ठाणे जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लगबग! २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज
By सुरेश लोखंडे | Published: June 10, 2024 04:58 PM2024-06-10T16:58:45+5:302024-06-10T16:59:24+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे.
ठाणे : वळवाच्या पावसाने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कहर केलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामास अनुसरून असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये बी-बियाण्याच्या, खताच्या खरेदीस अनुसरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातही या हंगामात सरासरी ६० हजार हेक्टर शेती लागवडीखाली येणार आहे. त्यासाठी तब्बल २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज लक्षात घेऊन तशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजार हेक्टरवर अधिक लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. गेल्यावर्षी ५३ हजार ७४२ हेक्टरवर भात पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदाच्या या खरीप हंगामास अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रुपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी अधिकाऱ्यांनी एकत्र येत घेतलेल्या निर्णयानुसार कृषी विभागाने ११ हजार ११० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी शासनाकडे केली असता जिल्ह्यासाठी दहा हजार मेट्रिक टन खताचा साठा मंजूर केला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीस अनुसरून मंजूर खताच्या साठ्यापैकी सात हजार ९०० मे. टन युरिया खताचा वाटा त्यात आहे. याशिवाय जिल्ह्यांसाठी २२ हजार क्विंटल भात बियाण्यांची गरज आहे. त्यात ४५ टक्के बियाणे बदल गृहित धरून नऊ हजार ९०० क्विंटल भात बियाण्यांची माग जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे. या बियाण्यांपैकी दाेन हजार २०० क्विंटल बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील असून सात हजार ७०० क्विंटल बियाणे खाजगी बियाणे उत्पादक कंपन्याकडून जिल्ह्याला पुरवण्यात येणार आहे. तर उर्वरित १२ हजार १०० क्विंटल भात बियाणे शेतकरी स्वत:कडील वापरणार असल्याच्या माहितीला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दुजाेरा दिला आहे.
नियंत्रण कक्ष -
खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या पुरवठ्याबाबतच्या अडचणी, बोगस खते, बियाणे विक्री, जादा दराने निविष्ठांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांना ७०३९९४४६८९ या माेबाइल क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येईल.
भरारी पथके -
कृषी सेवा केंद्रांकडून रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी, बेकायदा विक्री जादा दराने विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहेत. ही भरारी पथके केव्हाही अचानक कृषी केंद्रांना भेट देतील व तपासणी करतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी सांगितले.