यंदा नाले सफाईचा मुहूर्त पालिकेने लवकर साधला ; १० जूनपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे ध्येय
By धीरज परब | Published: April 18, 2023 06:20 PM2023-04-18T18:20:34+5:302023-04-18T18:20:46+5:30
१० जून आधी नालेसफाई पूर्ण केली जाणार असून ४ कोटींचा खर्च होणार आहे .
मीरा रोड - यंदा नगरसेवकांची स्थायी समिती , महासभा नसल्याने मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने पावसाळ्या आधीच्या नालेसफाईची निविदा व कार्यादेश आदी प्रक्रिया लवकर पूर्ण करून नालेसफाई सुरु केलेली आहे . १० जून आधी नालेसफाई पूर्ण केली जाणार असून ४ कोटींचा खर्च होणार आहे .
मीरा भाईंदर शहरात १५५ कच्चे व पक्के नाले पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत . त्यातील सुमारे १३० पक्के तर २५ कच्चे आहेत . नगरसेवक असले कि नाले सफाईच्या कामाच्या मंजुरी साठी आडमुठेपणा केला जाण्याचे अनुभव असल्याने प्रत्यक्ष कामास सुद्धा विलंब होत असे . यंदा प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाने नाले सफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश आशापुरा कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊन १७ एप्रिल पासून नाले सफाईच्या कामास सुरवात झाली आहे .
आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात महत्वाचे व अत्यावश्यक असलेले नाले साफ केले जातील . दुसऱ्या टप्प्यात त्यापेक्षा कमी महत्वाचे व नंतर उरलेले सर्व नाले साफ करणार आहोत . ज्या ठिकाणी यंत्राने नालेसफाई होत नव्हती त्या गणेश देवल नगर भागात पहिल्यांदाच अडथळा ठरलेली ४ बेकायदा बांधकामे तोडण्यात आली आहे . या शिवाय महाजन वाडी , डाचकूल पाडा भागात देखील नालेसफाई कामात अडथळा ठरणारे बांधकामे तोडल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी सांगितले .
कामात बालकामगार प्रतिबंधित केले असून नाल्यातून निघणाऱ्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदार वर आहे . कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे डॉ . पानपट्टे म्हणाले .