ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 15, 2024 08:30 PM2024-10-15T20:30:35+5:302024-10-15T20:31:19+5:30

ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा.

This years Gandhar Gaurav Award was announced to veteran actor Vijay Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, 
गेल्यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृहा दळी हिला देण्यात येणार आहे. 

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे नववे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर तर गेल्यावर्षी महेश कोठारे यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते गोखले यांना देण्यात येत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे  आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते गोखले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के - सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्यावर्षी
गंधार बालकलाकार पुरस्कार खुशी हजारे हिला दिला होता. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी मकरंद पाध्ये आणि प्रकाश निमकर यांनी परीक्षण केले होते. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते. 
 
यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी 
१ जान्हवी किल्लेकर 
२ गौरव मोरे
३. अंशुमन विचारे
 
बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी न्यू नटराज थिएटर पुणे (संस्था प्रमुख दिलीप नाईक) या संस्थेला देण्यात येणार आहे.

Web Title: This years Gandhar Gaurav Award was announced to veteran actor Vijay Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे