बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याला आता काटेरी कुंपण
By Admin | Published: July 19, 2016 03:01 AM2016-07-19T03:01:20+5:302016-07-19T03:01:20+5:30
बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने गर्दी होते.
बदलापूर : बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने गर्दी होते. मात्र त्यातील काही पर्यटक धबधब्यावरुन थेट कुंडात उड्या मारत असल्याने त्यातून जीव जाण्याच्या घटना वाढत आहेत. अशा पर्यटकांना आवर घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने धबधब्याच्या वरील बाजुला काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. तसेच ज्या ठिकाणावरुन पर्यटक कुंडात उड्या मारतात तेथेही काटेरी तार लावण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे कुंडात बुडुन होणाऱ्या मृत्युला आळा घालण्यास मदत होणार आहे.
यंदाच्या पावसाळ््यात दमदार पाऊस झाल्याने कोंडेश्वरचा धबधबा फेसाळू लागल्यावर लागलीच पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाली. केली होती. शेकडो पर्यटक गर्दी करत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. असे असले तरी अनेक पर्यटक कसलीही तमा न बाळगता या धबधब्याच्या कुंडात उंचावरुन उड्या मारतात. अनेक पर्यटकांना कुंडातील कपारींचा अंदाज येत नसल्याने ते कपारीत अडकतात. त्यात अनेक पर्यटकांचा मृत्यूही झाला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच चार पर्यटकांचा मृत्यू झाल्यावर कोंडेश्वर धबधबा हा मृत्यूचा सापळा झाल्याची चर्चा होती. असे असले तरी पर्यटकांची गर्दी मात्र कमी होत नाही. भविष्यात पर्यटकांचा मृत्यू होऊ नये यासाठी आमदार किसन कथोरे यांनी या धबधब्याची पाहणी केली होती.
धबधब्याच्या वरील बाजुस आणि परिसरात काटेरी तारा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या कुंडाभोवती आणि धबधब्याच्या वरच्या बाजुला काटेरी तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. या सुरक्षेच्या उपायामुळे आता मस्तीखोर पर्यटकांना कुंडात उड्या मारता येणार नाहीत. कोणी तसा प्रयत्न केल्यास तो या काटेरी तारांमध्ये अडकेल.
‘‘गेल्या पाच वर्षात कोंडेश्वर धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. येथे अपघात होऊ नयेत, यासाठी तारा बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुंडात कोणीच उड्या मारू शकणार नाही. प्राथमिक स्तरावर ही उपाययोजना आहे. भविष्यात कायमस्वरुपी उपाय योजण्यात येणार आहेत.
- राजेंद्र सोमवंशी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.