‘त्या’ २३० बसेसला नव्या वर्षाचा मुहूर्त
By admin | Published: October 26, 2015 12:42 AM2015-10-26T00:42:39+5:302015-10-26T00:42:39+5:30
परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला होता.
ठाणे : परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला होता. त्याचा ठेकेदार मिळाला असून आता त्यांनी पुढील टप्प्यातील बोलणी सुरू केली आहे. परंतु, मुल्ला बाग आणि ओवळा येथील आगाराचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने दाखल होणाऱ्या या नव्या बसेस कुठे उभ्या करायच्या, असा सवाल सध्या परिवहनला सतावू लागला आहे. मात्र, येत्या डिसेंबरअखेर हे दोनही डेपो खुले केले जातील, असा दावा करून नव्या वर्षात सुरू करण्याची हमी महापौरांनी दिली आहे.
ठाणे परिवहन सेवेत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २३० बसेस घेण्यात येत आहेत. त्यातील १५ व्होल्वो बस दाखल झाल्या असून उर्वरित १५ बसेस या मुल्लाबाग येथील आगाराचे काम पूर्ण झाल्यानंतर दाखल होणार आहेत. उर्वरित १९० बसेससाठीदेखील खाजगी ठेकेदार नेमण्याचे निश्चित झाले आहे. प्रति किमी रॉयल्टी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या या बसेसवर परिवहनची मालकी असणार असून ती संबंधित ठेकेदाराला आगार उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भात निविदा काढून तिला तीन वेळा मुदतवाढ देऊनही एकही ठेकेदार पुढे आला नव्हता. सोमवारी एक बैठकही पार पडली. परंतु, त्यांनी दिलेल्या दरावरून सध्या वाटाघाटी सुरू असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. असे असले तरी हाच ठेकेदार अंतिम केला जाणार असल्याचा दावा परिवहनने केला आहे. त्यानुसार, नव्याने दाखल होणाऱ्या बसला चालक मिळणार असले तरीदेखील घोडबंदर भागातील मुल्ला बाग आणि ओवळा डेपोचे काम रखडल्याने या बस कुठे उभ्या करायच्या, असा प्रश्न आहे. परिवहनमार्फत त्यासाठी घोडबंदर येथील ओवळा आणि मानपाडा येथील भूखंड ताब्यात घेतले आहेत.