जू गावातील ते ५८ लोक अखेर तीन दिवसानंतर पोहचले स्वगृही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:54 PM2019-08-07T19:54:05+5:302019-08-07T19:54:18+5:30
शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवडी येथील भातसा नदीला पूर आल्याने रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
- उमेश जाधव
टिटवाळा - शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवडी येथील भातसा नदीला पूर आल्याने रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान येथील जू देखील गावाला पूराच्या पाण्याचा वेडावला बसला. यात येतील ५८ लोक या पोरात अडकली होती. त्यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. अखेर तीन दिवसानंतर ते आपल्या येथील स्वगृही परतले आहेत. सध्या त्यांच्या गावात कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांचे पथक पहणी करण्यासाठी दाखल झाले आहे.
कल्याण तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागाला ही मोठ्या प्रमाणात पुराचा वेढा पडला होता. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरे पूराच्या पाण्यात होती. अशीच परिस्थिती खडवली येथे निर्माण झाली होती. येथील जू गावात २० महिला, २५ पुरुष व १३ लहान मुलं असे ५८ लोक अडकले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना एन डी आर एफ व वायुसेनेचे हेलिकॉप्टर यांनी रेस्क्यू करून ठाणे, बालकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तीन दिवस त्यांची या ठिकाणी रहाण्या- खाण्यापिण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरसेवक संजय भोईर यांनी. तसेच यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. पूर ओसरल्ल्या नंतर अखेर तीन दिवसानी मंगळवारी सायंकाळी त्यांना शासकीय वाहानाने खडवली येथील जू या आपल्या स्वगृही सोडण्यात आले.
या गावात पूरात कैलास पालवी, रवींद्र रामू सवार, विष्णू पालवी रमेश परशुराम जाधव, गणेश परशुराम जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, आनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे इत्यादींसह ५८ लोक अडकली होती.
बुधवारी सदर ठिकाणची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी कल्याण तहसिलदार दिपक आकडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जागेवर जाऊन घरांचे पंचनामे केले आहेत. तसेच बाधित लोकांशी चर्चा साधून त्यांच्या व्यथा ही जाणून घेतल्या.
या पूरात या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोलमजुरी करणाऱ्या या आदिवासी बांधवांनी वर्षभराचे धान्य घरात साठवून ठेवले होते ते ही या पूरात वाहून गेले आहे. तसेच त्यांच्या ४० शेळ्या देखील वाहून गेलेल्या आहेत. येथील शेतकरी विष्णू पालवे यांची भातशेती व दुध देणाऱ्या 10 म्हशी या पूरात वाहून गेल्या आहेत.
तो दिवस आठवला की अंगाला काटा मारतो. अतिशय कठीण परिस्थितीत आम्ही काही तास पूर सदृश्य परिस्थितीत अडकलो होतो. दैव बलवत्तर होते म्हणून आम्हाला शासकीय मदत पोहोचली आणि आमचे जिव वाचले. परंतु आमची जानावरे व शेती आम्ही वाचू शकलो नाही.
- कैलास विष्णू पालवी
आम्ही खूप घाबरलो होतो. आमच्या गावाच्या चारी बाजुनी पाणी आणि आम्ही मध्ये आडकलो होतो. आम्ही तर जगण्याची आशाच सोडली होती. परंतु शासकीय यंत्रणेमुळे आम्ही वाचलो.
- रवींद्र रामू सवार
आम्हाला सुरक्षित स्थळी हलवले, परंतु आमचे सगळं लक्ष आमच्या घरी लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती व घराचे काय होईल याच चिंतेत होतो. मंगळवारी सायंकाळी घरी आलो तर जागेवर काहीच नाही, सर्व काही पूराच्या पाण्यात वाहून गेले आहे. जो विचार येत होता तेच घडले.
- विष्णू पालवी