‘त्या’ नाराज अध्यक्षांचा सेनाप्रवेश? प्रताप सरनाईकांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:59 AM2017-12-19T01:59:25+5:302017-12-19T01:59:43+5:30
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रीया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरून हकालपट्टी केली. भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असून ते सेनेतील प्रवेशासाठी आतूर झाल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे. ‘लोकमत’च्या गुरूवारच्या अंकात ‘भाजपाला पडणार खिंडार’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी दावा केला.
राजू काळे
भाईंदर : मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रीया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरून हकालपट्टी केली.
भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असून ते सेनेतील प्रवेशासाठी आतूर झाल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे. ‘लोकमत’च्या गुरूवारच्या अंकात ‘भाजपाला पडणार खिंडार’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी दावा केला.
भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सल्ल्याचा आधार घेत कुणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू केला आहे. पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातील पदाधिकाºयांना पदांचे व उमेदवारीचे गाजर दाखवून निष्ठावंतांची गळचेपी सुरू केली आहे. एकहाती सत्तेचा दुरूपयोग भाजपाकडून होत असून आपल्या शब्दालाच हुकमी पत्ता ठरवून स्थानिक नेतृत्वाचा मनमानी कारभार चालला आहे. शहरातील विकासाला चालना देणारा विरोधकांचा ठराव बहुमताच्या जोरावर सत्ताधारी अमान्य करत असून प्रशासनाच्या मान्यतेलाही मातीमोल ठरवू लागले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.
प्रशासनही बेकायदा व मनमानी कारभार चालवणाºया सत्ताधाºयांच्या दबावाखाली काम करत आहेत. हेच दबावतंत्र भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने गटबाजीच्या नावाखाली अवलंबण्यास सुरूवात केली आहे. पालिका निवडणुकीत निष्ठावंतांनी जीवाचे रान केले. परंतु, त्यांना पराभूत करून समर्थकांच्या विजयासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप पक्षांतर्गत होऊ लागला आहे. अशातच त्या निष्ठावंतांना पक्षाच्या मुख्य प्रवाहातूनच बाजूला सारण्याची प्रक्रीया स्थानिक नेतृत्वाने केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
‘ओखी’प्रमाणेच ‘नमो’ चे वादळ संपुष्टात येऊ लागले आहे. ‘ओखी’ने अनेकांचे नुकसान केले तर ‘नमो’च्या वादळाने देशातील सर्वांचेच नुकसान केले आहे. त्याची परफेड यंदाच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी करण्यास सुरूवात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सत्तेची मस्ती चढलेल्या भाजपापासून काडीमोड घेण्याचा निर्णय नाराज मंडळ अध्यक्षांनी घेतला असल्याचे ते म्हणाले. आता हे सर्व नाराज मंडळ अध्यक्ष शिवसेनेत कधी प्रवेश करतात, हे लवकरच कळेल.