‘त्या’ चिमुरड्यांवर पंधरा दिवसांत वारंवार बलात्कार, सरकारी समितीचा प्राथमिक निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:50 AM2024-08-24T05:50:53+5:302024-08-24T05:55:10+5:30
शाळा प्रशासन तब्बल ४८ तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.
बदलापूर : बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलींवर पंधरा दिवसांत अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाले असावे, आरोपी अक्षय शिंदे यांची पार्श्वभूमी तपासल्याखेरीज त्याला नियुक्त केले, मुलींवरील अत्याचाराची तक्रार आल्यावरही संस्थेचे विश्वस्त ४८ तास स्वस्थ बसून राहिले, असे धक्कादायक निष्कर्ष राज्याने नियुक्त केलेल्या दोन सदस्यीय समितीने सरकारला सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात काढण्यात आले.
अहवालात नेमके काय?
- त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.
- गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता.
- १ ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली.
- त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता.
- त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे.
- हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.
- शाळा प्रशासन तब्बल ४८ तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.
- तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.
- पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला १२ तास लागले.
- या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारले की ‘मुली दोन तास सायकल चालवतात का?’ यावरून अशा संवेदनशील प्रकरणांना हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान अधिकाऱ्याला नव्हते.