‘त्या’ ठेकेदारांचा रात्रीस खेळ चाले
By admin | Published: July 14, 2016 01:45 AM2016-07-14T01:45:25+5:302016-07-14T01:45:25+5:30
विविध प्रकारच्या गैरव्यवहारात अडकलेल्या ठेकेदारांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले असले तरी ठाण्यात मात्र त्यांची कामे रात्रीच्या अंधारात राजरोसपणे सुरू आहेत
ठाणे : विविध प्रकारच्या गैरव्यवहारात अडकलेल्या ठेकेदारांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले असले तरी ठाण्यात मात्र त्यांची कामे रात्रीच्या अंधारात राजरोसपणे सुरू आहेत. मुंबई महापालिकेने बंदी घातलेल्या ठेकेदारांना ठाणे महापालिकेने कोट्यवधींची कामे दिली असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने नियमांची पायमल्ली करून ही कामे सुरू असून त्यांच्या दर्जाबाबत मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन पालिका आयुक्तांनी १६ आॅगस्ट २०१३ रोजी एक परिपत्रक काढून १७ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले होते. या ठेकेदारांना पालिकेतले कोणतेही काम देऊ नये, अशी स्पष्ट ताकीदही दिली होती. मात्र, या यादीत नाव असलेल्या दोन ठेकेदारांना ठाणे महापालिकेने कोट्यवधींची कामे दिली आहेत. पोखरण रोड
क्र मांक-२ च्या आरएनबी आणि आर.पी. शहा या ठेकेदारांना बहाल केले आहे. हे काम २५ कोटींपेक्षा जास्त खर्चाचे आहे. सध्या मुंबई महापालिकेत गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्यात आर.पी. शहा या कंपनीचेही नाव आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या काँक्रि टीकरणासह अन्य कामे करण्यास बंदी असतानादेखील पोखरण रोड-२ च्या कडेला असलेल्या गटारांचे बांधकाम भरपावसात या ठेकेदाराकरवी सुरू आहे. दिवसा कोणीही काम करताना दिसत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी ही कामे चोरी चोरी चुपके चुपके सुरू आहेत. ठाणे पालिकेने आपल्या हद्दीतील नालेबांधणीचे ८ ठिकाणचे टेंडर काढले असून त्यापैकी सुमारे सात ते आठ कोटी रु पये खर्चाची चार कामे मीरा कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिली असून या ठेकेदारालाही मुंबई पालिकेने २०१३ मध्ये काळ्या यादीत टाकले आहे. एकूणच पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल याबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.