लोकमान्य नगरातील ‘त्या’ पाट्या अद्यापही तशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:53 AM2021-02-27T04:53:27+5:302021-02-27T04:53:27+5:30

ठाणे : लोकमान्य नगर भागात लावलेल्या गुगल प्लस कोडच्या पाट्या काढण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी आठ दिवसांपूर्वी महासभेत ...

The 'those' signs in Lokmanya Nagar are still the same | लोकमान्य नगरातील ‘त्या’ पाट्या अद्यापही तशाच

लोकमान्य नगरातील ‘त्या’ पाट्या अद्यापही तशाच

Next

ठाणे : लोकमान्य नगर भागात लावलेल्या गुगल प्लस कोडच्या पाट्या काढण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी आठ दिवसांपूर्वी महासभेत दिले होते. परंतु, अद्यापही या पाट्या उतरवलेल्या नाहीत. त्यामुळे महापौरांच्या आदेशालाच पालिकेच्या संबंधित विभागाने केराची टोपली दाखविली की काय?, अशी शंका आता निर्माण झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

महापालिकेने ‘एक घर, एक शौचालय’ या मोहिमेच्या माध्यमातून शहरात सर्वेक्षण सुरू केले होते. परंतु, याला लोकमान्य नगर भागात रहिवाशांचा विरोध झाल्यानंतर महासभेतही येथील स्थानिक नगरसेविकेने मुद्दा उचलून धरला होता. त्यात या उपक्रमासाठी घरांचे सर्वेक्षण करून त्यांना गुगल प्लस कोड देण्यात येणार असल्याचे प्रस्तावित केले होते. परंतु, महासभेच्या मंजुरीआधीच या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्याचा प्रकार सभेत उघडकीस आला होता.

महापालिका प्रशासन आणि संबंधित संस्थेने दिवाळीत अंघोळीच्या साबणाचे आमिष दाखवून घरोघरी सर्वेक्षण केल्याचा आरोप नगरसेविका आशा डोंगरे यांनी केला होता. तसेच अनेक घरांना गुगल प्लस कोडच्या पाट्याही लावल्या असून, त्याचा गैरवापरही होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाची कानउघडणी केली होती. तसेच ज्या भागात नागरिकांचा विरोध नसेल तिथेच हा उपक्रम आता राबविण्याच्या सूचना देत लोकमान्य नगरातील घरांना लावलेल्या गुगल प्लस कोडच्या पाट्या काढण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु, आठ दिवस उलटूनही प्रशासनाने अद्याप पाट्या काढण्याची कारवाई सुरू केलेली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

---------------

Web Title: The 'those' signs in Lokmanya Nagar are still the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.