‘त्या’ करदात्यांना प्रशासकीय दंड माफ करा - महापौर
By admin | Published: December 8, 2015 12:20 AM2015-12-08T00:20:57+5:302015-12-08T00:20:57+5:30
वेळेवर मालमत्ता कर न भरणाऱ्या करधारकांना प्रशासकीय कर लावून बिल लावण्यात आले आहे. गतवर्षी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ३१ जानेवारीपर्यंत जे मिळकतधारक
ठाणे : वेळेवर मालमत्ता कर न भरणाऱ्या करधारकांना प्रशासकीय कर लावून बिल लावण्यात आले आहे. गतवर्षी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ३१ जानेवारीपर्यंत जे मिळकतधारक थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षाच्या मागणीसह संपूर्ण भरतील, त्यांना आकारलेला १०० टक्के प्रशासकीय दंड माफ करण्याबाबतची सूचना ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी मनपा प्रशासनाला केली आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही त्याच धोरणानुसार मोहीम राबवावी, अशी मागणी करून त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सादर करावा, असे महापौरांनी कळवले आहे.
मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे व्हावी, या दृष्टिकोनातून जे मालमत्ताधारक ३१ जानेवारीपर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षात संपूर्ण भरतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या मालमत्ता करावरील प्रशासकीय आकार १०० टक्के माफ करण्यात आला होता.
महापालिकेच्या या योजनेस मालमत्ताधारकांनी उदंड प्रतिसाद देऊन जवळजवळ १७,८२९ इतक्या मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. जे मिळकतधारक २८ फेब्रुवारीपर्यंत थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षाच्या मागणीसह अधिक प्रशासकीय आकाराच्या ३४ टक्के रक्कम भरतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या मालमत्ता करावरील ६६ टक्के प्रशासकीय दंड माफ करण्यात आला होता. ३१ मार्चपर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर, चालू आर्थिक वर्षाच्या मागणीसह अधिक ६७ टक्के भरतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या मालमत्ता करावरील प्रशासकीय आकार ३३ टक्के माफ केला होता.
जास्तीतजास्त मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरावा, यासाठी ही योजना प्रशासनाने अमलात आणली तर निश्चितच मालमत्ता करवसुली वेळेत होईल, असा विश्वास महापौरांनी वर्तवला आहे.
या प्रकारच्या योजनेला मागील वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यंदाही ही योजना राबवावी.