‘त्या’ १४ गावांत पाणीटंचाई; केमिकल मिश्रित पाण्याकडे जि.प.चे दुर्लक्ष :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:15 AM2018-12-15T00:15:59+5:302018-12-15T00:16:22+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेली १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट केलीे. मात्र, त्यांना सध्या अत्यावश्यक सोयीसुविधांसह तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेली १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट केलीे. मात्र, त्यांना सध्या अत्यावश्यक सोयीसुविधांसह तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोअरिंगमध्ये केमिकल झिरपल्यामुळे गावकऱ्यांवर केमिकल मिश्रित पाणी पिण्याचा प्रसंग ओढावला. पाण्याच्या नावाखाली साडेसहा कोटींची उधळपट्टी करणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याच्या वृत्तास जि.प. सदस्य रमेश पाटील यांनी दुजोरा दिला.
केमिकल कंपन्यांमधील भंगार, ड्रम हे कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल बोअरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे तिचे पाणी केमिकल मिश्रित झाले. या विषारी पाण्याचा सामना करणाºया १४ गावातील नारिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील या गावांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाव्दारे(एमजेपी) पाणीपुरवठा होतो. एमजेपीच्या या प्रशासनाकडून खासदार -आमदारांची शाबासकी मिळवण्यासाठी तात्पुरते एमआयडीसीच्या पाण्याचे पाणी सोडले जाते. एमआयडीसीचा व्हॉल्व खोलून सुरळीत पाणीपुरवठा असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका कार्यक्रमाव्दारे भासवल्याच्या वृत्तासही पाटील यांनी दुजोरा दिला.
एमजेपीच्या नियंत्रणात साडेसहा कोटी रूपये जिल्हा परिषदेने खर्च केल्याचे दिसून येत आहे. त्याव्दारे अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तुटलेली पाइपलाइन दिसत आहे. सुमारे २०१४ मध्ये मंजूर झालेल्या या साडेसहा कोटींच्या कामातून तांब्याभर पाणीदेखील १४ गावांना आजपर्यंत मिळालेले नाही. २७ महिन्यात काम पूर्ण करायचे होते. मात्र, ते आजपर्यंतही पूर्ण झाले नाही. संबंधीत ठेकेदार कंपनीला जिल्हा परिषद व एमजेपी पाठिशी घालून गावकºयांना पाणीटंचाईच्या झळा सोसायला भाग पाडत आहे.
साडेसहा कोटी खर्चाचे काम दाखवण्यासाठी नवी मुंबईच्या जुन्या पाइपलाइनला व्हॉल्व लावून ती गृहीत धरण्याचा पराक्रमही प्रशासनाने केला. जुन्या लाइनमुळे ती सतत फूटत आहे. प्रेशरने पाणी सोडता येत नाही. यामुळे १४ गावातील नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. पण त्यावर काहीच केले जात नसल्याची खंत त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.
लोकप्रतिनिधींबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप
सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुन्हा साडेबारा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे सांगितले जात आहे. पण आधीच्या साडेसहा कोटींच्या खर्चाचे मात्र कोणी ऐकूणच घ्यायला मागत नाही. या परिसरात १९ गावांचा समावेश आहे. त्यातील वडवली, शिरडोण, खानिवडे आदी गावांना बºयापैकी पाणी मिळते. पण खोणी, अंतरर्ली, पागड्याचापाडा, दहिसर, पिंपरी, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडार्ली, उत्तरशीव, गोठेघर, नारिवली, बाळे आणि वाकळण आदीं गावकºयांना गंभीर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या तीव्र संतापातून नागावला कृषीचा कार्यक्रम महिलांनी घेऊ दिला नाही. तीन महिन्यात पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन देऊनही लोकप्रतिनिधींनी काम केले नसल्याचा संताप या गावकºयांमध्ये धगधगत आहे.