"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार; ‘एनडीए’ ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:46 PM2023-07-30T12:46:26+5:302023-07-30T12:46:55+5:30

शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या हिंदी भाषिक कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते...

Those who are accused of corruption will sit on their laps; 'NDA' is a wagon of corruption | "ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार; ‘एनडीए’ ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी"

"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार; ‘एनडीए’ ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी"

googlenewsNext


ठाणे : येणारी लोकसभेची २०२४ ची निवडणूक भाजपला कठीण दिसत असल्याने ‘आ जा मेरे गाडी में बैठ जा’ या पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांना भाजप आपल्यासोबत घेऊन एनडीएची जमवाजमव करीत आहे. परंतु महाराष्ट्रात अजित पवार यांना सोबत घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ मोदींवर आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी झाली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे  केली.

शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या हिंदी भाषिक कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, मी मोदी किंवा कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, मी सध्या सुरू असलेल्या गुलामगिरीच्या विरोधात आहे. भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करायचे आहे. देशावर यापूर्वी पोर्तुगीज, इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्या गुलामीतून आपली मुक्तता झाली. ते गेले तसे यांनादेखील एक दिवस जावेच लागले, असे ठाकरे म्हणाले. मणिपूरमध्ये दोन महिलांवर अत्याचार केले, पण कोणी कृष्ण बनून त्यांना वाचवायला पुढे गेला नाही. महाभारतात द्रौपदीने अब्रू वाचविण्यासाठी कृष्णाचा धावा केला होता. यावेळी द्रौपदी वस्त्रहरणावरील एक कविता वाचून दाखवत ठाकरे यांनी पंतप्रधानांचे धृतराष्ट्र असे वर्णन केले. ते म्हणाले की, धृतराष्ट्राला डोळे नव्हते, आपल्या पंतप्रधानांना डोळे असूनही त्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत. देशाच्या राष्ट्रपतीपदी महिला आहे, मणिपूरच्या राज्यपाल महिला आहेत, त्यांना हे दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला. मणिपूरमध्ये सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स पाठवून दंगेखोरांची चौकशी केली व अमित शाहांनी दंगलखोरांचा भाजपमध्ये समावेश केल्यास दंगल दुसऱ्या दिवशीच शांत होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

ठाकरे म्हणाले की, भाजप हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. चायनीज मालसुद्धा बाजारात येतो आणि देवाच्या मूर्तीसुद्धा चायनीज मिळतात,  तसेच काही बोगस लोक शिवसेनेला आपले म्हणताहेत पण मला त्यांना सांगायचं आहे की, आम्हीच खरी शिवसेना आहोत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील. 

एक व्यक्ती ही देशाची ओळख नव्हे
ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्या की भाजपला एनडीएची आठवण येते. जुने मित्र आठवतात. तुम्ही बलवान झालात मग तोडफोडीचे राजकारण का करताय. यावरून भाजपचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून येते. देश म्हणजे भाजप नाही, भारतमाता सर्वांची आहे. भारताच्या स्वातंत्र्यात भाजपचे कोणतेही योगदान नव्हते. देशाची ओळख कोणत्याही व्यक्तीच्या नावाने होत नाही. निवडणुका आल्या की जात, भाषा, पंथ यांच्यात भांडण लावण्याचे काम ते करतात. देशाचा विकास हा धर्मावर नसून उद्योग आणि तंत्रज्ञानावर झाला पाहिजे.  माझ्यावर माझे कुटुंब आणि माझ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांशी प्रेमसंबंध असल्याने मी नेहमीच कुटुंबप्रमुख म्हणून काम करेन. 
 

Web Title: Those who are accused of corruption will sit on their laps; 'NDA' is a wagon of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.