मंदिरातील पूजेचे साहित्य चोरी करणाऱ्यांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By नितीन पंडित | Published: July 24, 2023 07:50 PM2023-07-24T19:50:16+5:302023-07-24T19:50:32+5:30
पोलिस पथकाने कल्याण खडवली परिसरात शोध घेवून राजकुमार रामप्रताप सोनी व अरुण रामप्रताप सोनी मुळ रा.बिकानेर राजस्थान अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले.
भिवंडी: भिवंडी ग्रामीण भागात मंदिरातील तांब्या पितळेचे पूजेचे साहित्य चोरी प्रकरणी दोघा अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी तालुका पोलिसांना यश आले असून चोरट्यांकडून २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे मंदिरातील साहित्य जप्त करून भिवंडी तालुक्यातील दोन व शहापुर तालुक्यातील एक अशा तीन गुन्ह्याची उकल केली असल्याची माहिती सोमवारी तालुका पोलिसांनी दिली आहे.
२७ जून रोजी तालुक्यातील चिंचवली येथील हनुमान मंदिरातील ७० किलो वजनाच्या दोन पितळेच्या घंटा व ८५ किलो वजनाच्या चार पितळेच्या समया असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे मुख्य दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडुन चोरुन नेल्या बाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण बळीप,पोलिस नाईक जयवंत मोरे व पोलिस शिपाई सुशिल पवार या पथकाने घटनास्थळ व रस्त्यातील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून आरोपीं माहिती मिळविली.
त्यानंतर पोलिस पथकाने कल्याण खडवली परिसरात शोध घेवून राजकुमार रामप्रताप सोनी व अरुण रामप्रताप सोनी मुळ रा.बिकानेर राजस्थान अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी भिवंडी तालुका हद्दीतील भिनार व शहापुर येथील शंकर महादेव, गुरुदत्त व लक्ष्मी नारायण मंदिर येथे चोरी केल्याचे कबूल केले आहे.त्यांच्या जवळून तिन्ही गुन्ह्यात चोरी केलेले २०० किलो वजनाच्या तांबे, पितळी समया घंटा,त्रिशूळ असे पूजा साहित्य व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी पोलिस नाईक जयवंत मोरे व पोलिस शिपाई सुशिल पवार यांना पुष्पगुच्छ व रोख पारितोषिक देवून सन्मानित केले.