ज्यांना आरक्षण हवे त्यांनी आपल्या मुलांना सैन्यदलात भरती करावे : सुमेधा चिथडे
By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 4, 2024 06:43 PM2024-02-04T18:43:27+5:302024-02-04T18:43:56+5:30
राष्ट्रासाठी संकट येते तेव्हा निरपेक्ष उभे राहतात ते म्हणजे सैनिक अशा भावना व्याख्यात्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केल्या.
ठाणे : आपले राष्ट्रसुरक्षित रहावे म्हणून सैन्यदल सीमेवर लढत आहेत. आमचा एकही सैनिक रस्त्यावर उतरत नाही पण राष्ट्राच्या रक्षणासाठी सीमेवर उभा आहे. ज्यांना आरक्षण हवे त्यांनी सैन्य जिथे उभे आहे तिथे उभे रहावे. ज्यांना आरक्षण हवे त्यांनी आपल्या मुलांना सैन्यदलात भरती करावे. सैन्य हे माझ्यासाठी देव आहेत. राष्ट्रासाठी संकट येते तेव्हा निरपेक्ष उभे राहतात ते म्हणजे सैनिक अशा भावना व्याख्यात्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केल्या.
सुयश कला-क्रीडा मंडळ, ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे तिसरे आणि शेवटचे पुष्प सुमेधा चिथडे यांच्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या व्याख्यानाने गुंफले गेले. सैनिक बांधव हे संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करीत असतात हे सांगत चिथडे यांनी सैनिकांचे जगणे श्रोत्यांसमोर मांडले. राष्ट्राविषयी आपण माझेपण जपतोय का? हे अंतर्मनाला विचारा असा सल्लाही त्यांनी दिला. जातपात सोडून आपण भारतीय आहोत असे अभिमानाने आपण सांगितले पाहिजे.
आपण आपल्या राष्ट्राला वर्तनातून कसे उभे करतो हे महत्त्वाचे आहे. शौर्य, त्याग, पराक्रम याला आपण महत्त्व देतोय का? दुर्दैवाने तरुणांचे आदर्श हे सिने क्षेत्रातील मंडळी आहेत. राष्ट्र प्रथम हे आपण तरुणांमध्ये भिनवले पाहिजे. राष्ट्र संरक्षणाची ताकद आपण पुढच्या पिढीला देतोय का? असा प्रश्न चिथडे यांनी उपस्थित केला. राष्ट्र ही भावना म्हणून आपण जगतो तर सगळंच म्हणून दुसऱ्याने करावे तर मग मी काय करावे? मी फक्त उपभोग घ्यावा? माझा काय संबंध या मानसीकतेमुळे राष्ट्राची संघटना, घडण आणि राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येते अशी शोकांतिका त्यांनी व्यक्त केली.