ठाणे जिल्ह्यात पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले नसले तरी दुसऱ्या डोसची चिंता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:54+5:302021-06-30T04:25:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात ऑफलाईन रजिस्ट्रेशन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात ऑफलाईन रजिस्ट्रेशन होत असल्याने येथील रहिवाशांना पहिला डोस घेतल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांकडून अद्याप एकही तक्रार आली नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे. या ठिकाणी नागरिकांना योग्य प्रकारे लस दिली जात असून तूर्तास तरी काही अडचणी नसल्या तरीदेखील भविष्यात त्या येऊ नयेत यासाठी ठाणे जिल्हा आरोग्य यंत्रणोने कंबर कसली आहे. यात ज्या नागरिकांना पहिला डोस मिळालेला असेल आणि त्यांना प्रमाणपत्र मिळाले नसेल, तरीदेखील त्यांनी घाबरून जाण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण नाही. त्यांचा दुसरा डोस केव्हा आहे, याची माहिती नागरिकांच्या घरोघरी जाऊन दिली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातही १ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात केवळ पाच तालुक्यांतच ही मोहीम सुरू केली होती. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यांतही ती वेगाने सुरू आहे. परंतु, पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस केव्हा किंवा एखाद्याकडे पहिल्या डोसचे प्रमाणपत्र नसेल तरी अशा नागरिकांना चिंता करण्याचे कारण जिल्हा आरोग्य विभागाने ठेवलेले नाही. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी इंटरनेट किंवा हायटेक सुविधा नाहीत, त्या ठिकाणी ऑफलाईन लसीकरण मोहीम राबविली जात आहे. घरातील ज्या व्यक्तीकडे मोबाइल असेल त्या व्यक्तीचा क्रमांक दिला तरी त्याला दुसऱ्या डोसचा मेसेज हा त्या मोबाइलवर जात असतो. परंतु, यापुढेही जाऊन ग्रामीण भागातील जनतेचे १०० टक्के लसीकरण व्हावे या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणेने आपल्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांना दुसऱ्या डोससाठीची आठवण करून दिली जात आहे. त्यानुसार त्यांना आदल्या दिवशीदेखील याची माहिती दिली जात आहे. त्यानुसार योग्य पद्धतीने लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण - २१,९५,१४८
पहिला - १७,७०,६४५
दुसरा डोस - ४,२४,५०३
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास
पहिला डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र मिळाले नाही तरी चिंता नाही; कारण दुसऱ्या डोसचा मेसेज हा त्या नागरिकांच्या मोबाइलवर जात असतो. तसेच आरोग्य विभागासह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसची तारीख जवळ आली असेल, अशा व्यक्तींना घरोघरी जाऊन दुसरा डोस घेण्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे पहिल्या डोसचे प्रमाणपत्र असावेच असे नाही.
मोबाइल नंबर कोणाचा हेच आठवत नाही (प्रमाणपत्र नसलेल्या दोघांच्या प्रतिक्रिया)
मी पहिला डोस घेतला; परंतु, मला त्याचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे मला दुसरा डोस मिळेल का नाही? याची चिंता होती. मात्र, आरोग्य विभागाने केलेल्या सहकार्यामुळे माझी ती चिंता मिटली. दुसरा डोस केव्हा आहे, याची आठवण त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी घरी येऊन दिली. त्यातही त्यांच्याकडे असलेल्या नोंदीनुसार मला दुसरा डोस घेता येणे सहजशक्य झाले.
(सचिन राऊत )
मी ज्येष्ठ महिला आहे. त्यात माझ्याकडे मोबाइलदेखील नाही. त्यामुळे मी माझ्या मुलाचा मोबाइल क्रमांक दिला होता. त्यातही पहिला डोस घेतल्यानंतर त्याच्या मोबाइलवर मेसेज आला होता. तसेच दुसरा डोसच्या वेळेसही मेसेज आला. त्यानुसार त्याचाच आधार घेऊन मला दुसरी लसही सहजरीत्या मिळाली.
(अलका नेवरेकर - महिला)
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
लसीकरणासाठी नोंद करताना शक्यतो स्वत:चा मोबाइल नंबर द्यावा. स्वत:कडे नसल्यास अगदी जवळच्या नात्यातील नंबर द्यावा. लसीकरणानंतर लगेच प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी. त्यातही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक भागांत अशी सोय नसल्याने त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी दुसऱ्या डोसची आठवण करून देत असल्याचे दिसत आहे.
......
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आरोग्य विभागाकडून ऑफलाईन पद्धतीनेच लसीकरण सुरू आहे. परंतु, अद्यापही या लसीकरण मोहिमेत कुठेही अडचणी आलेल्या नाहीत. पहिला डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र मिळाले तरी दुसरा डोस केव्हा आहे, याची माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन दिली जात आहे. त्यामुळे प्रमाणपत्र नसले तरीदेखील लसीकरणात कोणत्याही प्रकारे अडचणी येत नाहीत.
- डॉ. मनीष रेंघे - जिल्हा आरोग्याधिकारी, ठाणे