खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी रक्षाबंधन बिनधास्त साजरे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:28 AM2017-08-02T02:28:43+5:302017-08-02T02:28:46+5:30
श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सामान्यपणे ग्रहणकाळ वाईट समजत असले तरी या काळात रक्षाबंधन तसेच नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण साजरे करण्यात काहीच अनिष्ट...
ठाणे : श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सामान्यपणे ग्रहणकाळ वाईट समजत असले तरी या काळात रक्षाबंधन तसेच नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण साजरे करण्यात काहीच अनिष्ट नसल्याचे पंचागकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. हे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी (मुंबई) चंद्रोदय होईल. त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के प्रकाशीत दिसेल. नंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होणार असून रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत आल्यानंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण सुटेल. हे चंद्रग्रहण आपणास साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे दुर्बिण किंवा द्विनेत्री असेल त्यांनी त्यातून चंद्रग्रहण निरीक्षण करण्यास हरकत नाही असे ते म्हणाले. हे चंद्रग्रहण सॅरॉस चक्र ११९ क्र मांकातील आहे. यादिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ९४ हजार ७७० किलोमीटर अंतरावर असेल. यंदा श्रावण अमावास्येला (२१ आॅगस्ट) खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु, ते ग्रहण भारतातून दिसणार नाही. ते हवाई, उत्तर पूर्व पॅसिफिक महासागर, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, युरोपचा अतिपश्चिमेकडील भाग आणि पश्चिम आफ्रिका येथून दिसेल. अमेरिकेच्या मोठ्या भागातून या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार असल्याने ते मनोहारी दृश्य पाहायला अनेक खगोलप्रेमी अमेरिकेला जाणार आहेत. पुढच्या वर्षी बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही ते म्हणाले.