निर्बंध हटले तरी यंदा फटाकेविक्री थंडावलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:53 PM2018-10-28T22:53:24+5:302018-10-28T22:53:55+5:30
बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती.
बदलापूर : यंदा बदलापूरमध्ये फटाकेविक्रीला उतरती कळा लागल्याचे जाणवत आहे. बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती.
पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत बदलापूरमध्ये फटाकेविक्रिसाठी परवानगी दिली जात होती. मात्र, गेल्या वर्षी याचे प्रमाण ५० होते. तर, यंदा केवळ ३३ जणांनी परवानगीसाठी अर्ज केल्याची माहिती आर.बी. पाटील यांनी दिली. सर्वाेच्च न्यायालयाने फटाक्यांबाबतीत लादलेली विविध बंधने तसेच नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत होणारी जागरूकता आणि बदलापूर शहरापासून फटाकेविक्री केंद्र उल्हास नदी चौपाटीवर नेल्याने या साऱ्याचा परिणाम म्हणून बदलापूरमधील किरकोळ फटाकेविक्रेत्यांनी या व्यवसायातून आपले अंग काढून घेतले आहे. त्यामुळे बदलापूरमधील फटाकेविक्री व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीही उल्हास नदी येथे फटाकेविक्री केंद्रातील अनेक विक्रेत्यांचे फटाके विकले न गेल्यामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा अनेक किरकोळ फटाकेविक्रेत्यांनी फटाकेविक्रिसाठी अर्ज केलेला नाही.