ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:41 PM2022-07-08T19:41:19+5:302022-07-08T19:42:06+5:30

मुंबईसह ठाण्यात गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत.

Though Thane was given the post of Prime Minister, the problem persisted, MNS targeted the Chief Minister | ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next

ठाणे : ठाण्यात गेले तीन दिवस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय, ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा उद्विग्न संताप मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. तेव्हा, ठाणेकरांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून यावेळी तरी विचार करून निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

मुंबईसह ठाण्यात गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर तसेच, ठाणे-माजीवडा जंक्शन-घोडबंदर रोड-कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका शुक्रवारी दुपारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघालेल्या जाधव यांनाही बसला. ठाणे मनपा मुख्यालयाजवळून वसईकडे जाण्यासाठी निघालेले जाधव तब्बल अर्धातास व्हिवियाना मॉल जवळच अडकून पडले. या वाहतूक कोंडीचा फटका शहरातील रुग्णवाहिका, शाळेच्या वाहनांना बसत असून तासनतास वाहने कोंडीमध्ये अडकून पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास स्थानापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व्हिस रोडवर देखील वाहतूक कोंडी झाली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर संबधित प्राधिकरणाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या वाहतूक कोंडीचा फटका सकाळ दुपार आणि सायंकाळी कामावर जाणाऱ्या व परतणाऱ्या नागरिकांना बसतो. घोडबंदर परिसरात राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. तसेच, शाळकरी विद्यार्थ्याना आणि रुग्णवाहिकांना देखील तासन तास अडकून पडावे लागत आहे. खड्डे बुजवण्यात तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यात वाहतूक विभाग आणि प्रशासन कमी पडत आहे, असा आरोपही जाधव  यांनी केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे आगमन यंदा उशिरा झाल्याने या कालावधीत उत्तम नियोजन केले गेले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. ठाण्यात कितीतरी आमदार आहेत, त्या आमदारांना मंत्रीपदे दिली तरी सुद्धा समस्या अजून सुटली नाही. सर्वसामान्य नागरीक कर भरतो, त्याचाही विचार केला जात नाही. तेव्हा, मुख्यमंत्रीच काय तर ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी ही समस्या तशीच राहणार आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता यायला हवी. तरच सुधारणा होतील अन्यथा या समस्या कायम राहतील. तेव्हा, यापुढे मतदान करताना विचार करा.. असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
 

Web Title: Though Thane was given the post of Prime Minister, the problem persisted, MNS targeted the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.