मेहतांच्या शाळेत इच्छुकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:22 AM2017-08-02T02:22:10+5:302017-08-02T02:22:10+5:30
यादी जाहीर होत नसल्याने भाजपात अस्वस्थता असतानाच आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेतून राजकीय हालचाली सुरु असल्याने
मीरा रोड : यादी जाहीर होत नसल्याने भाजपात अस्वस्थता असतानाच आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेतून राजकीय हालचाली सुरु असल्याने इच्छुकांनी रात्री उशिरापर्यंत तेथे ठिय्या दिला होता. त्यामुळे नेमका कसा तोडगा काढावा यातच भाजपा नेते गुंतले होते. आयत्यावेळी प्रबाग बदलून काहींची वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शांतीनगरच्या प्रभाग २० मध्ये भाजपाचे नगरसेवक असतानाही शिवसेनेच्या दळवी यांना घेतल्याने बंडाळी माजली. मेहतांचे समर्थक असणाºया दळवींना उमेदवारी भरण्यास सांगितल्याने भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांनी बंडाचा झेंडा फडकवताच जैन यांना उमेदवारी देण्यात आली, तर हेतल परमार या अन्य उमेदवारांसह वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरण्यास निवडणूक कार्यालयात गेल्या असता त्यांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले. सुधीर कांबळी यांच्या पत्नीला परमार यांच्या जागी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. शिवसेनेतून आलेल्या दळवींनाही अर्ज भरल्यावर दुसºया प्रभागात जाण्यास सांगण्यात आले. दळवींनी तर प्रभाग २० मध्ये प्रचारही सुरु केला होता. आता त्यांना प्रभाग १७ मधून अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत पालांडे यांच्यासमोर दळवींना उभे करुन मेहतांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.
प्रभाग १४ मध्ये भाजपात चुरस सुरु असुन अनिल भोसले की मीरादेवी यादव, असा पेच कायम आहे. भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग पाचमधून गटनेते शरद पाटील यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. आता नगरसेवक राकेश शहा यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. नगरसेविकांमध्ये वर्षा भानुशाली की मेघना रावल अशी स्पर्धा कायम आहे. प्रभाग दोनमधून भाजपा नगरसेविका कल्पना म्हात्रे यांना अजून अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. त्यातच उत्तर भारतीय नगरसेवकाला उमेदवारी डावलली, असा प्रचार सोशल मीडियावर सुरु होताच भाजपाने मदनसिंह यांना अर्ज भरण्यास सांगितले. यामुळे नगरसेवक यशवंत कांगणेंचे भवितव्य अधांतरी आहे.
प्रभाग सहामधून नगरसेवक डॉ. रमेश जैन यांना उमेदवारी नाकारुन नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग १३ मधून भाजपात नव्याने आलेल्या अनिता मुखर्जी यांचे नांव नक्की केल्याचे समजताच येथील अन्य महिला इच्छुकांनी पक्षनेत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.