ठाण्यात शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचा दहा हजार गरजूंनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:06 PM2018-04-30T22:06:04+5:302018-04-30T22:06:04+5:30
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिराचा दहा हजार गरजूंनी लाभ घेतला. यावेळी सुमारे दोन कोटीं रुपयांची औषधे गरजूंना विनामूल्य देण्यात येत आहे.
ठाणे: सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्र म) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार आणि सोमवारच्या दोन दिवसांमध्ये तब्बल दहा हजार ठाणेकरांनी या शिबिराचा लाभ घेतला. सुमारे दोन कोटीं रुपयांची औषधे गरजूंना विनामूल्य देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किसन नगर-२ येथील नेपच्यून एलिमेंट , रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट या ठिकाणी २९ एप्रिल ते १ मे अशा तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, परिवहन सभापती अनिल भोर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे चाप्टरचे अध्यक्ष दिनकर देसाई, वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. भोर आदी उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या शिबीराचा समारोप १ मे रोजी होणार आहे.
तब्बल ३५० हून अधिक डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी असे सुमारे ७०० जणांचे पथक याठिकाणी तैनात केले आहे. सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी याठिकाणी करण्यात येत आहे. गरजूंवर मोफत किंवा सवलतीच्या दरात नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रीया देखिल करण्यात येणार आहे. नेत्ररोग, हृदयरोग, कर्करोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग, मनोविकार , ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, मधुमेह, श्वसनाचे विकार, त्वचारोग, कान, नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार , बालहृदयविकार अशा सर्व प्रकारच्या आजारांवर येथे तपासणी आणि उपचार केली जाणार असून आयुर्वेदिक औषधोपचारासाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांवर देखील या शिबिराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात टूडी इकोसाठी नाव नोंदणी केलेल्या मुलांची जून महिन्यात ठाण्याच्या सुप्रसिद्ध रुग्णालयात मोफत तपासणी आणि सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
गरजूंना मिळाली तीन कोटींची मदत
एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे - शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम ठाणे (पूर्व) येथील कोपरी कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त विविध गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या साडे पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५०० गरजूंना अंदाजे तीन कोटी रुपयांपर्यंतची मदत या कक्षाच्या माध्यमातून केली आहे.
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व प्रकारच्या आजारांवर रु ग्णांची तपासणी करण्यात येत आहे. ज्या रु ग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रु ग्णांची शस्त्रक्रीया मोफत किवा सवलतीच्या दरात ठाण्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी केले आहे.