ठाणे जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 05:49 PM2018-11-30T17:49:59+5:302018-11-30T17:55:48+5:30
जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना ४ हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
ठाणे - जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना ४ हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख २७ हजार ९०८ पत्रिका तयार करण्याचे उद्दिष्ट्य असून आत्तापर्यंत सुमारे ५० हजार पत्रिका वाटप झाले आहे. या दिवशी शेतकऱ्यांना विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव,एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे. म्हणून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला २ वर्षातून एकदा मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. यात किती प्रमाणात कोणते खत त्या जमिनीसाठी वापरावे तसेच कोणती पिके घ्यावी हे नमूद केलेले असते. या कार्यक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.