कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर
By जितेंद्र कालेकर | Published: December 13, 2017 11:30 PM2017-12-13T23:30:08+5:302017-12-13T23:30:08+5:30
शस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणीही आवश्यक असल्याचे एकीकडे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे तिची तपासणीच अन्यत्र करण्यास फर्मावण्यात आल्यामुळे रुग्णांची चांगलीच फरफट होत आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची तपासणी अभावी ससेहोलपट होत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. ‘एचआयव्ही’ची तपासणी करणारा तंत्रज्ञच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरी परतावे लागल्यामुळे रुग्णांनी नाराजी व्यक्त केली.
ठाण्याच्या लुईसवाडीतील ६७ वर्षीय अशोक परब हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालयात आले होते. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना रक्ताच्या विविध चाचण्या तसेच साखरेचे प्रमाणही तपासण्यास सांगण्यात आले. बुधवारी सकाळी उपाशीपोटी आणि नाष्टयानंतर अशा दोन्ही तपासण्या केल्या. त्यानंतर त्यांना ‘एचआयव्ही’ची तपासणीही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. परब यांच्यासह २५ रुग्ण या तपासणीसाठी त्या कक्षामध्ये गेले तेंव्हा तेथील कक्षाचा दरवाजा बंद होता. रुग्णांनी विचारपूस केल्यानंतर ही तपासणी करणा-या संबंधित कर्मचा-याला गेल्या चार दिवसांपासून मंत्रालयात कामकाजासाठी पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णांनी ठाणे महापालिकेच्या टेंभीनाका येथील वाडिया रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे फर्मान तेथील कर्मचा-यांनी सोडले. आता शस्त्रक्रियेसाठी ही तपासणी आवश्यक असल्यामुळे परब यांच्यासह २० ते २५ रुग्ण वाडिया रुग्णालयात आले. तिथे गेल्यावरही तेथील कर्मचा-यांनीही सहकार्याऐवजी ‘आमचे सिव्हील रुग्णालयाशी बोलणे झाले आहे, त्यामुळे तुम्ही तिथूनच या तपासण्या करा, इथे या तपासण्या होणार नाहीत,’ असे तेथील कर्मचा-यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. तिथे ही तपासणी करणारे कोणीही उपलब्धच नव्हते. त्यामुळे परब यांच्यासारख्या अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालय ते वाडिया अशी पायपीट करूनही तपासण्या न झाल्यामुळे केवळ मन:स्ताप सहन करावा लागला. अनेक रुग्णांनी त्यावर संताप व्यक्त केला. दरम्यान, रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी मात्र कर्मचाºयाला कोठेही पाठविले नसल्याचे सांगून कर्मचाºयांचा तुटवडा असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. या रुग्णांनी मला भेटून हे सांगायला हवे होते. पण त्यांची गुरुवारी सकाळी तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘‘ आता डोळयावरील शस्त्रक्रिया एकवेळ एक दोन दिवस लांबविताही येईल, पण आणखीही काही गंभीर रुग्ण असतील तर त्यांनाही या तपासणीअभावी परत पाठविले जात होते. गंभीर आजारावरील रुग्णांची एचआव्हीच्या तपासणीअभावी जर अशी ससेहोलपट होत असेल तर हे गंभीर आहे. यावर रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दखल घेणे आवश्यक आहे.’’
अशोक परब, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, ठाणे
‘‘ मंत्रालयात किंवा अधिवेशनासाठी या रुग्णालयातून कर्मचारी पाठविलेला नाही. कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल.संबंधितांची चौकशी करण्यात येईल.’’
डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे