राज ठाकरेंच्या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील १० हजार प्रवासी होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 07:06 PM2017-10-04T19:06:04+5:302017-10-04T19:06:54+5:30
एल्फिस्टन दूर्घटनेत बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा तसेच मध्य-पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या ८५ लाख रेल्वे प्रवाशांना सुखद-सुरक्षित-संरक्षित प्रवासाची हमी मिळावी यासाठी मनेसअध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील १० हजार जणांचा समावेश असेल.
डोंबिवली - एल्फिस्टन दूर्घटनेत बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा तसेच मध्य-पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या ८५ लाख रेल्वे प्रवाशांना सुखद-सुरक्षित-संरक्षित प्रवासाची हमी मिळावी यासाठी मनेसअध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील १० हजार जणांचा समावेश असेल. स्वत:च्या सुरक्षित प्रवासासाठी एकत्र या. या टॅगलाइनचा आधार घेत प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे.
यासंदर्भात बुधवारीही दिवसभर कृष्णकुंज येथे प्रवासी संघटनांचे निवडक पदाधिकारी, मनसेचे नेते, पक्षाच्या रेल कामगार सेनेचे नेते आदींची सखोल चर्चा झाली. कोणकोणत्या मागण्यांचा रेटा लावावा यासाठी आधी कृष्णकुंज नंतर राजगड येथिल पक्षाच्या कार्यालयात बैठका झाल्या. मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात येणारे विस्तृत निवेदन, त्यातील मागण्या आदींचा त्यात समावेश होता. मोर्चानंतर महाव्यवस्थापकांकडे चर्चेला जाणारे शिष्ठमंडळात कोणाकोणाचा समावेश करण्यात यावा यावरही चर्चा झाली. त्यावर बुधवारी रात्री अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातून ७५ बसेसच्या माध्यमाने साडेतीन हजार नागरिक त्या ठिकाणी जावे असा प्रयत्न असेल. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणांवरुन तीन हजार तर भिवंडी, शहापूर आदी भागांमधून दोन हजार नागरिक त्या मोर्च्यात सहभागी होतील असा विश्वास पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केला. याखेरिज प्रवासी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखिल सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. कल्याण-डोंबिबली महापालिकेतील पक्षाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते यामोर्चासाठी आवर्जून जाणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता सर्वांनी एकत्र जमण्यासाठी पक्षातर्फे आवाहन करण्यात आले असून सकाळी ११.३० वाजता मोर्चा निघणार असल्याचेही सांगण्यात आले.
रेल्वे मोर्चात जास्तीत जास्त प्रवाशांनी सहभागी व्हावे यासाठी ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या आवाहनांचे होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. सोशल मिडियावरील व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इमेल्स यावर राज यांचे पत्र, संदेश, एव्हीज पाठवून जनजागृती करण्यात आली आहे.