ठाण्यात हातभट्टीवरील धाडीत एक लाख 62 हजार रूपयांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 01:26 PM2017-09-13T13:26:12+5:302017-09-13T13:26:12+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने मोठी आणि छोटी देसाई तसेच ठाणे भरारी १ च्या पथकाने अंबरनाथच्या द्वारली गावातील हातभट्टीवर धाड टाकून रसायनासह एक लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ठाणे, दि. 13- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने मोठी आणि छोटी देसाई तसेच ठाणे भरारी १ च्या पथकाने अंबरनाथच्या द्वारली गावातील हातभट्टीवर धाड टाकून रसायनासह एक लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी डायघर आणि हिललाईन पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शीळ डायघर भागातील छोटी आणि मोठी देसाई गावाजवळील खाडी परिसरात दारु निर्मितीचे अड्डे सरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे लोढा हेवनच्या बाजूला खाडी किनारी मंगळवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार यांच्या पथकाने धाड टाकून प्रत्येकी २०० लीटरचे २६ रसायनांचे ड्रम तसेच अन्य एका ठिकाणी २०० लीटरचे १० ड्रम असे पाच हजार २०० लीटर रसायनांसह एक लाख १२ हजार ७०० चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या धाडीची चाहूल लागल्यामुळे दारुचा अड्डा चालविणारे मात्र पसार झाले.
दरम्यान, ठाणे भरारी १ चे निरीक्षक संजय कंगणे यांच्या पथकानेही मंगळवारी (१२ सप्टेंबर रोजी) अंबरनाथ मधील द्वारली गावात २२०० लीटर रसायनाच्या ११ ड्रमसह ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटी देसाई, मोठी देसाई आणि द्वारली याठिकाणी गावठी दारु निर्मितीसाठी जप्त केलेले रसायन नष्ट केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. बेकायदेशीर दारु विक्री आणि निर्मितीच्या ठिकाणांवर यापुढेही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी दिली.