फेरीवाले धडकले ठाणे पालिकेवर
By admin | Published: August 27, 2015 12:32 AM2015-08-27T00:32:20+5:302015-08-27T00:32:20+5:30
महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर सध्या महापालिका आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाईविरोधात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनच्या वतीने
ठाणे : महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर सध्या महापालिका आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाईविरोधात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या न्याय मागण्यांवर ४ ते ५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे युनियनने सांगितले.
काही दिवसांपासून शहरातील रस्ते, फूटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या आणि आठवडाबाजाराच्या माध्यमातून रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. परंतु, प्रत्यक्षात फेरीवाला धोरण अंतिम झाले नसताना अशा प्रकारे कारवाई करणे योग्य नसल्याचे मत युनियनने व्यक्त केले आहे. परंतु, असे असतानाही कारवाई सुरू झाली.
या कारवाईविरोधात बुधवारी फेरीवाल्यांनी एकत्र येऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. याचे नेतृत्व युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी केले होते. या वेळी त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, आयुक्तांनी येत्या ४ ते ५ दिवसांत फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने फेरीवाल्यांनी हे आंदोलन मागे घेतले. परंतु, लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही तर मात्र तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळेच आता आयुक्तांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)