जागेच्या वादातून महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 09:16 PM2020-09-27T21:16:50+5:302020-09-27T21:30:36+5:30
जागेच्या वादातून सोनी कोमगल (५३) या महिलेवर रिव्हाल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कळव्यातील सुधीर शर्मा, अपक्ष नगरसेवक जितेंद्र पाटील आणि मंगेश पाटील या तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: विटावा येथील जागेच्या वादातून सोनी कोमगल (५३) या महिलेवर रिव्हाल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कळव्यातील सुधीर शर्मा, अपक्ष नगरसेवक जितेंद्र पाटील आणि मंगेश पाटील या तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अन्य एका अशाच प्रकरणात राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोमगल यांनी कळवा पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार कळवा परिसरातील राजू म्हात्रे यांची जागा त्यांनी विकसित करण्यासाठी घेतली आहे. या जागेवर घरांचे बांधकाम केल्यानंतर त्यांच्या विक्रीतून ६० टक्के रक्कम त्या स्वत: घेऊन उर्वरित ४० टक्के रक्कम जागा मालक म्हात्रे यांना देण्याचे ठरले आहे. याशिवाय, विटावा येथेही त्यांची १२ गुंठे जागा असून या जागेवर अनधिकृतपणे कब्जा मिळविण्यासाठी स्थानिक रहिवाशी सुधीर शर्मा, मंगेश पाटील आणि नगरसेवक जितेंद्र पाटील हे वारंवार धमकवित असल्याचा आरोपही कोमगल यांनी केला आहे. हा प्रकार २०१४ ते ३० आॅगस्ट २०१९ या कालावधीत सुरु आहे. ‘तू विटावा परिसरात रुम बांधू नकोस, तू बाहेरुन आलेली भाडेकरु आहेस. भाडेकरुसारखी रहा, असे म्हणून तिला आणि तिच्या दोन वेळा मारहाण करण्यात आली. शर्मा याने तर त्याचे रिव्हॉल्व्हर आपल्या डोक्याला लावून सतत ठार मारण्याची धमकी देत जाती वाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही कोमगल यांनी केला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात नगरसेवक पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत २५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनीही घर बांधून दिले नाही. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार लक्ष्मीकुमार या महिलेने कळवा पोलीस ठाण्यात एक आठवडयापूर्वी केली. याप्रकरणी साळवी यांच्याविरुद्धही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.