ठाण्यात विडी पिण्याला विरोध केल्याने संतप्त कैद्याची पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 08:40 PM2018-07-09T20:40:12+5:302018-07-09T20:54:14+5:30
केवळ विडी ओढण्यास मनाई केल्याने संतापलेल्या एका कैद्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात घडला.
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात विडी ओढण्यास मनाई केल्याच्या रागातून आकाश तावडे या कैद्याने बंदोबस्तावर असलेल्या मुख्यालयातील पोलिसालाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. कहर म्हणजे त्याने या पोलिसाचा पट्टाही ओढून त्याचे नुकसान केले.
आकाश याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात तो ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. आकाश याच्यासह सहा जणांना शनिवारी मुंबईच्या दिंडोशी न्यायालयात नेले जाणार होते. त्यासाठी सकाळी ११ वा.च्या सुमारास आलेल्या मुख्यालयातील पोलिसांनी या सहा कैद्यांना बाहेर काढले. मात्र, पावसामुळे कारागृहाच्या आवारातील शेडमध्ये पोलीस आणि कैदी थांबले. त्याचवेळी घरी कॉल करण्यास आकाशने एका पोलीस शिपायाला सांगितले. त्यास नकार दिल्यानंतर त्याने विडी पिण्यास सुरुवात केली. त्याच्या विडी पिण्याला एका महिला पोलिसासह दोघा कर्मचाऱ्यांनी विरोध केला. त्याचवेळी आकाशने त्यांना शिवीगाळ केली. याच झटापटीत त्याने एका पोलिसाचा पट्टाही ओढल्याने त्याचे दोन तुकडे झाले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच या पोलिसांनी ठाणे शहर नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिली. तेव्हा ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकाशला नियंत्रित केले. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.