ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या ! पुण्यानंतर ठाण्यातही ‘माथाडीं’च्या नावाखाली छळवणूक
By जितेंद्र कालेकर | Updated: April 15, 2025 06:57 IST2025-04-15T06:56:58+5:302025-04-15T06:57:41+5:30
Thane Crime News: अशा एक ना दोन अनेक तक्रारींचा पाढा ठाण्यातील उद्योजकांनी वाचून दाखविला आहे. निमित्त होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने १०० दिवसांच्या कृती आराखड्यानिमित्त ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे (टीसा) पदाधिकारी, तसेच शहरातील उद्योजकांसोबतच्या चर्चेचे.

ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या ! पुण्यानंतर ठाण्यातही ‘माथाडीं’च्या नावाखाली छळवणूक
-जितेंद्र कालेकर, ठाणे
आमच्याकडे काही लोकांकडून तयार मालाची वाहतूक, स्क्रॅप विक्री, आदी कामांसाठी खंडणी मागितली जाते. स्क्रॅपचा माल नेण्यासाठी ठरावीक लोकांना काम देण्याची सक्ती केली जाते. ठरावीक रकमेसाठीही तगादा लावला जातो. एखादी व्यक्ती कमी पैशात काम करायला तयार झाली तरी त्यालाही काम करू दिले जात नाही, अशा एक ना दोन अनेक तक्रारींचा पाढा ठाण्यातील उद्योजकांनी वाचून दाखविला आहे.
निमित्त होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने १०० दिवसांच्या कृती आराखड्यानिमित्त ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे (टीसा) पदाधिकारी, तसेच शहरातील उद्योजकांसोबतच्या चर्चेचे.
ठाण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. चव्हाण यांनी या उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी अपर पोलिस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त प्रशांत कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ, आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते. दरमहा किमान १० हजार ते काही लाख रुपयांची खंडणी या खंडणीखोरांना द्यावी लागते. तरच त्यांचे व्यवहार सुरळीत सुरू राहतात, असेही उद्योजकांनी सांगितले.
पुणेपाठोपाठ ठाण्यातही माथाडी कामगारांच्या नावाखाली लोडिंग-अनलोडिंगची कामे देण्याच्या नावाखाली काही बड्या उद्योजकांना खंडणीसाठी धमकावले जात आहे.
बीडमध्ये उद्योगाकडून खंडणी वसुलीतून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे प्रकरण गाजत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील या खंडणी वसुलीचे गांभीर्य वाढले आहे. खंडणीखोरांनी उद्योजकांना धमकावले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
पोलीस मुख्यालयात बैठक, कारवाईचे आदेश
ठाणे ही उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असून, या ठिकाणी एक हजारांहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. उद्योजक, व्यापारी आणि पोलिस यांच्यात एक संवाद घडून त्यांना मोकळ्या भयमुक्त वातावरणात उद्योग, व्यवसाय करता यावा, यासाठी पोलिस मुख्यालयात ही बैठक घेण्यात आली.
यावेळी टीसा आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे (कोसिआ) मानद महासचिव भावेश मारू, उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
खंडणीखोरांचा काही राजकीय पक्षांशी जवळचा संबंध आहे असेही यावेळी काहींनी सांगितले. तेव्हा उद्योजकांना खंडणीसाठी कोणी त्रास देत असल्यास ते कदापि सहन केले जाणार नाही.
माथाडी किंवा त्यांच्या नावाखाली कोणीही असे वर्तन केल्यास गंभीर दखल घेतली जाईल. तसेच याबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना दिल्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. चव्हाण यांनी उद्योजकांना आश्वासित केले.
यासाठी येतात धमक्या
अनेक कारखान्यांमधील माल गुंड टोळ्यांचे म्होरके बाहेर जाऊन देत नाही. त्यांच्याकडून स्क्रॅप उचलणे, सामान लोडिंग अनलोडिंगच्या कामाची मागणी केली जाते. माथाडीच्या नावाखाली काही बिगर माथाडी लोक धमकी देतात. कामाचा आग्रह धरतात व काम कोणाला देता, बघतो, अशी धमकी देतात.
खंडणीचे वर्षभरात ७५ गुन्हे
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २०२४ मध्ये खंडणीचे ७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ६८ गुन्हे उघडकीस आले.
बिझनेस कैसा करता है देखते है... अशा शब्दात एका ७५ वर्षीय उद्योजकाला धमकाविण्यात आले. हे प्रकार वाढले आहेत. वर्षभरात १५ ते २० उद्योजकांना खंडणीसाठी धमकाविण्यात आले. अनेकांनी भीतीपोटी तक्रारही केली नाही. -संदीप पारीख (अध्यक्ष, टीसा, कोसिआ, ठाणे)