फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 08:47 AM2019-05-28T08:47:22+5:302019-05-28T08:47:48+5:30
नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ठाणे : मुंब्र्यातील फेरिवाल्यांवर धडक कारवाई करणाऱ्या पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
मुंब्र्यात फेरीवाले थेट मुख्य रस्त्यावरच बसत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेच्या वारंवार कारवाईनंतरही फेरीवाले हटत नव्हते. मात्र आहेर यांनी विशेष मोहिम राबवून फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. त्यामुळे रस्ते फेरीवालेमुक्त झाले. वाहतूक कोंडीचा त्रासही काहीसा कमी झाला् आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्यावतीने हटवलेल्या फेरीवाल्यांसाठी मित्तल मैदान आणि तन्वरनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात मार्केट तयार करण्यात आले आहे. समाजकंटकाकडून होणाऱ्या विरोधानंतरही सहाय्यक आयुक्तांनी फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. या चांगल्या कामगिरीची पालिका आयुक्तांनी दखल घेत आहेर यांचे विशेष कौतुकही केले.
शुक्रवारी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही आहेर यांचा सत्कार केला होता. मात्र आहेर यांना अनोळखी व्यक्तीने दिलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी आहेर पालिका मुख्यालयात असताना धमकीचा फोन आला. सैफ पठाण याच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, अनधिकृत बांधकाम तोडू नको आणि मुंब्रा गुलाब मार्केट येथील फेरीवाल्यांवर कारवाई नको करू अन्यथा बघून घेण्याची धमकी अनोळखी व्यक्तीने त्यांना दिली आहे. या धमकीनंतर आहेर यांनी तात्काळ नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.
याआधीही दोन हल्ले
यापूर्वी देखील आमच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दोन हल्ले झालेले आहेत. एका लिपिकावर चॉपरने हल्ला झाला होता. यामध्ये हा लिपिक जखमी झाला होता असे आहेर यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर मी बंदोबस्ताची मागणी केली होती. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बैठकीत मुंब्रा प्रभाग समितीमधील कर्मचारी आणि सहाय्यक आयुक्तांना बंदोबस्त वाढवून देण्याबाबत अनेकदा सांगितले आहे. तरीही सुरक्षा विभागाने बंदोबस्त दिला नसल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे.