पोलिसांसमोर चाळमाफियाच्या पालिका अधिकाऱ्याला धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:44+5:302021-08-22T04:42:44+5:30
मीरा रोड : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापौरांच्या प्रभागात गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यास अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियाने पोलिसांच्या समक्ष `मंत्र्याच्या ...
मीरा रोड : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापौरांच्या प्रभागात गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यास अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियाने पोलिसांच्या समक्ष `मंत्र्याच्या पीएला फोन लावतो, तुझी वाट लावतो,` अशा शब्दांत धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. धमकीनंतरही अधिकाऱ्याने त्याने बेकायदेशीरपणे बांधलेल्या सहा खोल्या पाडल्या असल्या तरी माफियांची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास आले.
काशीमीरा भागातील माशाचा पाडा परिसरात इकोसेन्सिटिव्ह झोन, ना विकासक्षेत्र व आदिवासी जमिनींवर प्रचंड मोठी झोपडपट्टी अनधिकृतपणे उभी राहिली आहे. या परिसरात सातत्याने नवनवीन बेकायदा बांधकामे होत असून, स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासन हे कारवाई करण्यात टंगळमंगळ करतात, असा आरोप आहे.
शुक्रवारी (दि. २०) महापौर ज्योत्स्ना हसनाळे व अन्य भाजपच्या तीन नगरसेवकांच्या प्रभागातील माशाचा पाडा येथे झालेल्या नवीन सहा अनधिकृत खोल्यांवर कारवाई करण्यास पालिका प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत हे पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना घेऊन गेले होते. त्यावेळी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांनी पालिका कारवाईत अडथळा आणत वरील शब्दांत त्यांना धमक्या दिल्या.
माफियांच्या विरोधानंतरही सहा बेकायदा खोल्यांवर जेसीबी चालवून अधिाकाऱ्यांनी ती जमीनदोस्त केली. यापूर्वी महापौरांच्या प्रभागातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी गेलेल्या पालिका पथकावर चाळमाफियांनी दगडफेक केली होती. लोकप्रतिनिधींचा या बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांवर वचक तर नाहीच; उलट ते त्यांना पाठीशी घालतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
.........
बेकायदा बांधकामे करणाऱ्यांकडून कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून कारवाईत अडथळा आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील बांधकामे तोडण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्वप्निल सावंत, प्रभाग अधिकारी, मीरा-भाईंदर महापालिका
..........