धमक्यांना घाबरून युवकाची आत्महत्या
By admin | Published: February 21, 2017 04:05 AM2017-02-21T04:05:53+5:302017-02-21T04:05:53+5:30
वांद्रे येथील एका व्यावसायिकाने केलेली मारहाण आणि डी कंपनीच्या नावे दिलेल्या धमक्यांना घाबरून ठाण्यातील एका युवकाने
ठाणे : वांद्रे येथील एका व्यावसायिकाने केलेली मारहाण आणि डी कंपनीच्या नावे दिलेल्या धमक्यांना घाबरून ठाण्यातील एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या युवकाचा मित्र व्यावसायिकाचे सुमारे ३० लाख रुपये घेऊन पळाला होता.
वांद्रे येथील राजेश हरगुणानी यांनी जुन्या वाहनांच्या खरेदीविक्रीच्या व्यवसायासाठी ठाण्यातील बाळकुम परिसरातील विकासदत्त पांडे याला २९ लाख ४० हजार रुपये दिले होते. पैसे घेऊन पांडे फरार झाल्याने हरगुणानी यांनी शनिवारी ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार, विकासदत्त पांडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
दरम्यान, ठाण्यातील लोकमान्यनगरात राहणारा कांतू गुडप्पा यादवंती (२८) याचा इंटरनेटचा व्यवसाय असून तो पांडेचा मित्र होता. विकासदत्त पांडे पैसे घेऊन फरार झाल्यानंतर, राजेश हरगुणानी यांनी पैशांसाठी कांतूला धमकावले. ४ फेब्रुवारी रोजी हरगुणानी यांनी ठाणे स्टेशनजवळील त्यांच्या कार्यालयात कांतूला बोलवून जबर मारहाण केली. डी कंपनीशी आपले थेट संबंध असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी हरगुणानी यांनी कांतूला दिल्याचे त्याच्या वडिलांनी १६ फेब्रुवारी रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मारहाण आणि धमक्यांना घाबरून कांतूने १२ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोपही त्याच्या वडिलांनी केला आहे. हरगुणानी यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत कांतूने पोलिसांकडे तक्रार केली होती, असेही त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.
हरगुणानी यांच्या फसवणुकीच्या तक्रारीपासून उजेडात आलेल्या या प्रकरणाने कांतूच्या आत्महत्येने वेगळेच वळण घेतले आहे. दुसरीकडे विकासदत्त पांडे याचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांना ठेवावा लागणार समन्वय
हरगुणानी यांची फसवणुकीची तक्रार ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये, कांतूच्या आत्महत्येची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये, तर विकासदत्त पांडे याच्या बेपत्ता होण्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात असल्याने तिन्ही तक्रारींच्या तपासात पोलिसांना समन्वय ठेवावा लागणार आहे.