मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना अटक: तीन तरुणींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:52 PM2019-01-16T18:52:56+5:302019-01-16T18:57:53+5:30
ठाण्यातील एका स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या फिरदोस हश्मीसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून २० ते २२ वयोगटातील तीन मुलींचीही सुटका त्यांनी केली
.ठाणे: मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या फिरदोस हश्मी (३२, रा. कासारवडवली, ठाणे), व्यवस्थापक अमिद असरअली (२६, रा. कशेळी, भिवंडी) आणि अरशद सलीम हश्मी (२०, रा. कासारवडवली, ठाणे) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्या तावडीतून २० ते २२ वयोगटातील तीन पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
कासारवडवली येथील पुराणिक कॅपिटल येथील तिस-या माळयावरील शॉप क्रमांक ३१० मध्ये साडे तीन हजारांच्या मोबदल्यामध्ये काही मुलींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शॉप क्रमांक ३१० मधील ‘अमारा स्पा’ या मसाज पार्लरमध्ये १५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ वा. च्या सुमारास एक बनावट गि-हाईक पाठवून छापा टाकला. त्यावेळी फिरदोसने दीड हजार स्वत:कडे ठेवून दोन हजार या मुलीकडे देत या बनावट गि-हाईकासोबत जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलीने दोन हजारांमधील दीड हजार रुपये फिरदोसकडे दिले. तर स्वत:कडे पाचशे रुपये ठेवले. फिरदोस आणि त्याचा भाऊ अरशद हे दोघे भागिदारीमध्ये हा व्यवसाय करीत होते. तर अमिद तिथे व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या सेक्स रॅकेटची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास या तिघांविरुद्ध ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनाही २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.