ठाणे नियंत्रण कक्षातील पोलीस महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:20 PM2019-07-08T23:20:29+5:302019-07-08T23:25:37+5:30
कोणालाही संकटकाळात मदत मिळण्यासाठी असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांनाच फोनवरुन अश्लील शिवीगाळ आणि संभाषण करणा-या तिघा विकृतांना ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. गेल्या एक आठवडयापासून ते हा प्रकार करीत असल्याचे उघड झाले.
ठाणे: ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी एक शून्य शून्य या तातडीची मदत मिळवून देणा-या क्रमांकावर संपर्क साधून अश्लील संभाषण करणा-या मुकेश सक्सेना (१९), गिरीश सक्सेना (१९) आणि आसू गौड (२४) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच सोमवारी अटक केली आहे. तिघेही डोंबिवलीच्या मानपाडा भागातील रहिवाशी असून त्यांना २२ जुलै २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
हे टोळके २७ जून २०१९ पासून ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या फोनवर संपर्क साधून अर्वाच्य भाषेत तेथील महिला पोलिसांशी संवाद करीत होते. कोणीतरी मद्यपी नशेत फोन करुन असे काहीतरी बडबडत असावा, असा समज करुन या महिला आणि त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. त्यानंतरही अधूनमधून असे फोन येत होते. परंतू, संपूर्ण आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील ३३ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिक वेगवेगळया प्रकारच्या मदतीसाठी संपर्क करीत असल्याने तसेच या नियंत्रण कक्षाला वरिष्ठांनाही गुन्हयांचा अहवाल देणे गरजेचे असल्याने त्यांनी पुन्हा याकडे दुर्लक्ष केले. परंतू, ७ जुलै रोजी ११.४९ वाजताच्या सुमारास आलेल्या फोनमुळे या महिला कर्मचारीही अस्वस्थ झाल्या. या कर्मचाºयांनी फोन उचलून समोरील व्यक्तीला काही मदत हवी आहे का? अशी विचारणा केल्यानंतर मुकेश सक्सेना आणि त्याच्या दोन्ही साथीदारांनी अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत संभाषण करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या प्रकाराचा कहर झाल्याने नियंत्रण कक्षातील महिलांनी अखेर वरिष्ठ अधिकाºयांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांनी मानपाडा पोलिसांच्या मदतीने मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेल्या मुकेश, गिरीश आणि आसू या तिघांना अवघ्या चार तासांमध्येच ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. हे तिघेही उल्हासनगर येथील एका कंपनीत रंग देण्याचे काम करतात. या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 509,504,आण ि34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यांच्यावर चापटर गुन्हा अंतर्गत ही करावी करण्यात येणार आहे