ठाण्यातील मेडीकलवरील गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह तीन आरोपींचा सहभाग
By जितेंद्र कालेकर | Published: January 6, 2020 11:12 PM2020-01-06T23:12:32+5:302020-01-06T23:17:27+5:30
कळवा येथील मेडिकलच्या दुकानात गोळीबार करुन तेथील कर्मचाऱ्याचा खून करुन आरोपीने पलायन केले होते. या प्रकरणात आणखी दोन महिलांचाही सहभाग असल्याचे सीसीटीव्हीतील चित्रणावरून स्पष्ट झाले आहे. याबाबतचे वृत्त लोकमत आॅनलाईनने या आधीच प्रसिद्ध केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा येथील मेडिकलच्या दुकानामध्ये चोरीसाठी शिरलेल्या चोरट्याने खून करून पलायन केल्यानंतर या प्रकरणात आणखी दोन महिलांचाही सहभाग असल्याचे सीसीटीव्हीतील चित्रणावरून स्पष्ट झाले आहे. या तिन्ही संशयित आरोपींची कोणाला माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केले आहे.
कळवा पूर्व येथील वीर युवराज मेडिकलमध्ये चोरीसाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. चोरी करून पळण्याच्या बेतात असतानाच दुकानामध्ये झोपलेल्या प्रेमसिंग राजपुरोहित या कर्मचाºयाला जाग आली. त्याने दुकानात शिरलेल्या चोरट्याला प्रतिकार करताच त्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यावेळी छातीत गोळी शिरल्याने प्रेमसिंगचा मृत्यू झाला. त्यानंतर, दुकानाच्या ड्रॉवरमधील आठ हजार ६५० रुपयांची रोकड आरोपीने लुटून नेली. या खून प्रकरणामध्ये एक नव्हे, तर तीन आरोपींचा सहभाग असून त्यात दोन महिलांचाही समावेश असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने ६ जानेवारीच्या अंकात तसेच लोकमत आॅनलाईनच्या अंकात प्रसिद्ध केले. हे वृत्त खरे ठरले असून पोलिसांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
या खून प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे पथक करीत आहे. खुनानंतर त्यांच्या पथकाने या मेडिकलसह संपूर्ण परिसरातील इमारतींच्या बाहेरील, तसेच रेल्वेस्थानक येथील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. मेडिकलच्या दुकानात आधी केवळ एक हल्लेखोर दिसत असला, तरी बाहेर टेहळणीसाठी दोन महिला असल्याचे आढळले. यातील हल्लेखोर पुरुषाने नारंगी रंगाचा शर्ट आणि खाकी पॅण्ट परिधान केली होती. तो २५ ते २८ वर्षे वयोगटातील आहे. त्याच्यासोबत बाहेर टेहळणी करणाऱ्यांपैकी पहिली महिला ३५ ते ४० वयोगटातील असून तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. दुस-या महिलेने निळ्या रंगाचा चुडीदार आणि खांद्याला पर्स, तसेच अंगावर पांढ-या रंगाची ओढणी घेतलेली आहे. ती २२ ते २५ वर्षे वयोगटातील आहे. हे तिघेही कळवा परिसरासह दादर रेल्वेस्थानक तसेच माहीम येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले आहेत. या तिन्ही आरोपींबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ शी संपर्क साधावा. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी केले आहे.
माहिती मिळाल्यास संपर्क साधा...
या आरोपींची माहिती असणा-यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या घटक-१ कार्यालयाच्या ०२२-२५३४३५६५ किंवा सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे यांच्याशी ०७३०४५९८०८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.