चोरटा निघाला सराईत, तीन चो-यांची कबुली दिली पण तक्रारदारच मिळेना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 09:17 PM2017-10-10T21:17:46+5:302017-10-10T21:17:54+5:30
चरईतील एका महिला वकिलाकडे लॅपटॉपची चोरी करतांना रंगेहाथ पकडलेल्या अफरोज शेख या चोरट्याने आणखी तीन ते चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील रेल्वेतील मोबाईल चोरीमध्ये त्याला अटकही झाली होती.
ठाणे: चरईतील एका महिला वकिलाकडे लॅपटॉपची चोरी करतांना रंगेहाथ पकडलेल्या अफरोज शेख या चोरट्याने आणखी तीन ते चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील रेल्वेतील मोबाईल चोरीमध्ये त्याला अटकही झाली होती. अन्य तीन गुन्ह्यांची त्याने कबुली दिली असली तरी संबंधितांची तक्रार किंवा तक्रारदारही न मिळाल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे.
चरईतील अॅड. स्वाती प्रधान चिटणीस यांच्या काबाडअळीतील ‘आनंदवन’ या इमारतीच्या कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून त्याने लॅपटॉप चोरला. या सोसायटीच्या काही दक्ष नागरिकांनी त्याला ८ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा. च्या सुमारास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने त्याला बोलते केल्यानंतर त्याने आणखी चार चो-यांची कबूली दिली. त्यातील रेल्वेतील एका मोबाईल चोरीमध्ये त्याला सहा महिन्यांपूर्वीच अटक झाली होती. या प्रकरणात त्याची तीन महिन्यांपूर्वीच जामीनावर सुटकाही झाली आहे. याशिवाय, राबोडी, ठाणेनगर आणि नौपाडा या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील परिसरातही तीन चो-या केल्याचा त्याने दावा केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यात एका घरात तो चोरीसाठी शिरला त्यावेळी तिथे घरातील मंडळी निद्रावस्थेत पाहून तो चोरीसाठी धजावला नाही. तर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र असलेल्या एका सोसायटीच्या घरातून त्याने सोन्याच्या रिंगा लांबविल्या. पण याचा तक्रारदार किंवा अन्य माहिती उपलब्ध झाली नाही. तिस-या चोरीसाठी जिल्हा रुग्णालयासमोरील वस्तीत शिरल्याचे तो सांगतो. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. तिथेही तक्रारदार किंवा चोरीचा ऐवज मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या जबाबातील तथ्यता आता पडताळली जात असून त्याच्या शुभम या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळवा झोपडपट्टी परिसरात शुभम आणि त्याची ओळख झाल्यानंतर दोघे मिळून वेगवेगळ्या ठिकाणी चो-या करीत असत. चोरीतील माल ते वाटून घेत असत. नौपाड्यात दोघांपैकी एक पकडला गेला असून त्याच्या दुस-या साथीदाराचा मात्र शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.