अंबरनाथमधील तिघांनी दुचाकीवरून केले १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; ४० दिवसांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:59 PM2019-10-29T22:59:25+5:302019-10-29T22:59:34+5:30
शिवमंदिरात झाली सांगता
अंबरनाथ : चारधाम आणि १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी अंबरनाथमधील तीन दुचाकीस्वार निघाले होते. त्या तिघांनी ४० दिवसांच्या प्रवाशानंतर ही यात्रा यशस्वी पूर्ण करुन यात्रेची सांगाता अंबरनाथच्या शिवमंदिरात झाली.
अंबरनाथ येथे राहणारे संदीप आचारी, मिलींद नागभीडकर, साई नागभीडकर या तिघांनी दुचाकीवरून चारधाम आणि १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. देशातील चार दिशांवर असलेले चारधाम आणि त्या अंतर्गत असलेले १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी १८ सप्टेंबरला प्रवास सुुरू केला. दोन दुचाकीवरून तीन प्रवासी अंबरनाथहून गुजरातमार्गे निघाले. त्यांनी ४० दिवसांच्या प्रवासानंतर ही यात्रा पूर्ण केली. अंबरनाथहून निघाल्यावर गुजरात येथील द्वारका त्यानंतर बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी आणि रामेश्वरम अशा देशातील चार टोकांचा प्रवास त्यांनी दुचाकीवरून केला. याच प्रवासादरम्यान देशातील १२ ज्योतिर्लिंगाचेही दर्शन या दुचाकीस्वारांनी केले. त्यात सोमनाथ, नागेश्वरनाथ, उज्जैन, ओंकारेश्वर, केदारनाथ, बैद्यनाथ, काशी विश्वनाथ आणि बैजनाथधामचेही दर्शन त्यांनी केले. चारधामच्या निमित्ताने या तीन भाविकांनी देशाची भ्रमंती केली.
दुचाकीवरून प्रवास करताना लागणारे दैनंदिन सामान घेऊन हा प्रवास करणे अवघड होते. मात्र मनात महादेवाचा जप करत हा प्रवास यशस्वी पूर्ण केला आहे. युवकांमध्ये धर्माप्रती श्रध्दा वाढावी या हेतूने हा प्रवास करण्यात आल्याचे संदीप आचारी यांनी स्पष्ट केले. तर या प्रवासात महिला असूनही जिद्दीने प्रवास पूर्ण करणाऱ्या साई नागभिडकर यांनीही बाईकविषयी तरुणांमध्ये उत्साह असतो. या उत्साहासोबत धार्मिकता जोपासल्यास आणि बाईकवरुन फिरण्याचा आनंद घेण्यासाठी धार्मिक स्थळांना भेट दिल्यास नव्या पिढीलाही श्रध्देच्या मार्गावर आणता येईल या हेतूने हा प्रवास केल्याचे स्पष्ट केले.