साडेतीन हजार विद्यार्थी ‘आधारकार्ड’विना

By admin | Published: May 7, 2017 05:53 AM2017-05-07T05:53:09+5:302017-05-07T05:57:07+5:30

शालेय साहित्यखरेदी करण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला शनिवारी शिक्षण समितीने हिरवा कंदील दाखवला. साहित्यखरेदीस

Three and a half thousand students without 'Aadhaar card' | साडेतीन हजार विद्यार्थी ‘आधारकार्ड’विना

साडेतीन हजार विद्यार्थी ‘आधारकार्ड’विना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शालेय साहित्यखरेदी करण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला शनिवारी शिक्षण समितीने हिरवा कंदील दाखवला. साहित्यखरेदीस लागणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु, खाते काढण्यासाठी लागणाऱ्या आधारकार्डापासून महापालिकेच्या शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थी वंचित असल्याचे समितीच्या बैठकीत समोर आले. यावर आधारकार्ड काढण्याची प्रक्रि या सुरू राहील, तोपर्यंत बँक खाते उघडण्यासाठी बोनाफाइडचा आधार घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्याचे स्पष्टीकरण शिक्षण अधिकारी जे.जे. तडवी यांनी दिले. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जूनअखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, असे आदेश सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी दिले.
शालेय साहित्यखरेदीसाठी लागणारा विलंब आणि यात चव्हाट्यावर येत असलेल्या भोंगळ कारभाराला चाप लागावा, यासाठी सरकारने काढलेला अध्यादेश समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. शालेय साहित्यखरेदीसाठी एकूण २ कोटी ४६ लाखांचा खर्च येणार असून ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या विषयावरील चर्चेच्या वेळी सदस्या वीणा जाधव यांनी किती विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले आहे, असा सवाल केला. अनेक विद्यार्थी निराधार आहेत, तसेच मजुरांची मुले आहेत. त्यामुळे त्यांचे बँक खाते उघडण्यास अडचण येणार आहे. परिणामी, विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे, याकडेही या वेळी जाधव यांच्यासह सदस्या आशालता बाबर यांनी लक्ष वेधले. यावर, महापालिकेचे ९ हजार ११८ विद्यार्थी आहेत. यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांची आधारकार्डे काढलेली नाहीत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, आधारकार्ड काढण्यासाठी यंत्रे उपलब्ध न झाल्याने बोनाफाइडद्वारे विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.७० टक्के विद्यार्थ्यांची बँक खाती उघडल्याचा दावाही तडवी यांनी या वेळी केला.
सरकारी अध्यादेशामुळे ही प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. परंतु, काही त्रुटी आढळल्यास आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला, तर निविदा प्रक्रिया पुन्हा अमलात आणली जाईल, असे घोलप यांनी सुनावले. २७ गावांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निधी ठेवला असून त्यांनाही तातडीने शालेय साहित्य मिळाले पाहिजे, असेही त्यांनी आदेश दिले.

आधी पैसे खात्यात जमा करा
खरेदी केल्यावरच खात्यात पैसे जमा होतील, असे सरकारचे धोरण आहे. परंतु, महापालिकेचे विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना खरेदी करणे शक्य होणार नाही. पैसे मिळाल्यावरच खरेदी करणे शक्य होईल, ही बाब लक्षात घेता सरकारला त्याप्रमाणे विनंती करून पैसे आधी जमा करा, अशी सूचनाही घोलप यांनी केली.

Web Title: Three and a half thousand students without 'Aadhaar card'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.