साडेतीन हजार वृक्षांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:55 PM2019-05-22T23:55:34+5:302019-05-22T23:55:36+5:30

मेट्रोसह बिल्डरहित : तासाभरात दिली मंजुुरी

Three-and-a-half thousand trees | साडेतीन हजार वृक्षांचा बळी

साडेतीन हजार वृक्षांचा बळी

Next

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण शिथिल होण्याच्या आधीच केवळ अत्यावश्यक बाबीचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अवघ्या एका तासात तब्बल तीन हजार ५२७ वृक्षतोडीस बुधवारी मंजुरी दिली. यामध्ये ९५० वृक्ष हे मेट्रोसाठी बाधित होणार असले, तरी तब्बल दोन हजार वृक्ष हे विकासकांच्या प्रकल्पात बळी जाणार आहेत.


निवडणूक आचारसंहिता असल्याने समितीची बैठक बोलावणे प्रशासनाला अडचणीचे झाले होते. त्यामुळे समितीवरील नगरसेवक सदस्य वगळून आणि केवळ तज्ज्ञ सदस्यांच्या उपस्थितीत ही मंजुरी देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. मात्र, त्याची कुणकुण सत्ताधाऱ्यांना लागल्यानंतर नगरसेवक आणि तज्ज्ञ सदस्यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत वृक्षतोडीचे हे प्रस्ताव झटपट मंजूर केले. एखादा अपवाद वगळता कोणत्याही प्रस्तावावर कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा तज्ज्ञ सदस्यांनीही पर्यायी मार्ग सुचवला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


या बैठकीत ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीअंतर्गत बांधल्या जाणाºया रस्त्यांसाठी ४८ झाडे तोडणे आणि ३२३ झाडांच्या पुनर्रोपणाला परवानगी दिली आहे. कळव्यातल्या ऊर्जा प्रतीक ते नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्यासाठी ८४, तर शिवाईनगर ते रामबाग आणि सिद्धांचल सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ३७ झाडे तोडली जाणार आहेत. रेमण्ड कंपनीच्या जागेवर रस्ता आणि मल्टिलेव्हल कार पार्किंग, क्लबहाउससाठी १४० झाडांचे पुनर्रोपण आणि ९१ झाडे तोडली जाणार आहेत.

बिल्डरांना पायघड्या : कोलशेत येथील लोढा बिल्डर्सच्या प्रकल्पासाठी २२५ झाडांची कत्तल आणि १२९ झाडांचे पुनर्रोपण, कोलशेत-कावेसर येथील हिरानंदानी बिल्डर्सच्या प्रकल्पासाठी ११९ झाडांचे पुनर्रोपण आणि ३२ झाडे तोडणे, पिरॅमल इस्टेटच्या बाळकुम येथील प्रकल्पात अडसर ठरणारी ४७३ झाडे तोडणे आणि ५१३ झाडांचे पुनर्रोपण, चितळसर-मानपाडा सेक्टर क्र . ४ येथील १७७ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ७६ झाडे तोडणे, ड्रीम होम्स कंपनीच्या शीळ येथील विकास प्रस्तावातील दोन झाडे तोडणे आणि ३३ झाडांचे पुनर्रोपण अशा बिल्डरधार्जिण्या प्रस्तावांना मंजुरी दिली.

Web Title: Three-and-a-half thousand trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.