राष्ट्रवादीचे आझम खान यांच्या हल्ल्यातील तिघांना अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:15 PM2021-07-22T23:15:19+5:302021-07-22T23:20:08+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर दहा दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर यातील हल्लेखोर पसार झाले होते. यातील गोविंद चव्हाण (२१) आणि कुणाल चव्हाण (१८) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर दहा दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर यातील हल्लेखोर पसार झाले होते. यातील गोविंद चव्हाण (२१) आणि कुणाल चव्हाण (१८) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसऱ्या अल्पवयीन हल्लेखोरालाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.
आझम खान हे १२ जुलै २०२१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपल्या पुतण्यासह मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाºया मार्गावरुन साकेत सेवा रस्त्याने भिवंडीच्या दिशेने काही कामानिमित्त टेम्पोने जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर पूर्ववैमनस्यातून तलवार आणि लोखंडी सळईने हल्ला केला होता. यात खान हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातील हल्लेखोरांच्या अटकेसाठी राष्टÑवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र आदोलनाचा इशारा दिला होता. यासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात १८ जुलै रोजी परांजपे यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांची भेटही घेतली होती. यावेळी खान यांची पत्नी आणि आई देखिल उपस्थित होती. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन त्यांनी मागे घेतले होते.
दरम्यान, या हल्लेखोरांच्या शोधासाठी कापूरबावडी पोलिसांची तीन पथके निर्माण केली होती. हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकलीला नंबरप्लेटही नव्हती. शिवाय, यात आरोपीचा पकोणताही दुवा नव्हता. हल्लेखोर आलेल्या मार्गावरील तब्बल ३५ सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी पोलिसांनी केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय निंबाळकर आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय पाटील आणि जमादार मोरे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २१ जुलै रोजी कापूरबावडीतील आमराईनगर येथून गोविंद चव्हाण आणि कुणाल चव्हाण या दोघांना अटक केली. तर त्यांचा अन्य एक १७ वर्षीय अल्पवयीन साथीदार याला हाजूरीतून ताब्यात घेतले आहे. गोविंद आणि कुणाल या दोघांनाही ठाणे न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अल्पवयीन साथीदाराला चार दिवस भिवंडीतील निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडी बाल न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.