विक्री केलेल्या प्लॉटवर बांधकामाच्या अमिषाने ९७ लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 3, 2018 10:32 PM2018-10-03T22:32:24+5:302018-10-03T22:40:38+5:30
ठाणे : आधीच विक्री केलेल्या प्लॉटवर बांधकाम करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका व्यावसायिकाला सुमारे ९७ लाखांचा गंडा घालणा-या सुनील सोनपुरा (५३), त्याची पत्नी नयना (४९) आणि मुलगा पार्थ (२३) या तिघांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांना ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाड्यातील एका प्लॉटवर पुनर्विकास करून देतो, मोठ्या कंपनीचे शेअर स्वस्तात मिळवून देतो तसेच चांगला व्यवसाय मिळवून देतो, अशी ठाण्यातील एका व्यावसायिकाला एकापेक्षा एक प्रलोभने दाखवून त्याच्याकडून सुनील या स्टाइलच्या व्यावसायिकाने तसेच त्याची पत्नी नयना आणि मुलगा पार्थ यांनी धनादेश तसेच रोखीच्या माध्यमातून ९७ लाख ७७ हजार रुपये उकळले. २०१२-२०१३ पासून त्याने या व्यावसायिकाकडून वेगवेगळ्या प्रकारे हे पैसे उकळले. आधी नौपाड्यातील ‘शुभ’ हॉटेलमागे असलेल्या विक्री केलेल्या प्लॉटवर पुनर्विकासाचे आमिष दाखवत त्याने २५ लाख रुपये घेतले. नंतर, एका मोठ्या कंपनीत आयातीमधून मिळणाºया कमिशनमध्ये हिस्सा देण्याचे प्रलोभन दाखवत पुन्हा १२ लाख ९७ हजार रुपये काढले. २०१२ पासून या व्यावसायिकाकडून पैसे काढल्यानंतर त्याने पैशांसाठी तगादा लावल्यानंतर त्याला त्याने वेगवेगळ्या दिवशी सुमारे २० धनादेश दिले. हे सर्व धनादेश ५० लाखांपेक्षा अधिक मूल्याचे होते. यातील एकही धनादेश वटला नाही. तब्बल सहा वर्षे उलटूनही आपले पैसे परत न केल्याने या व्यावसायिकाने अखेर याप्रकरणी १० सप्टेंबर २०१८ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात सोनपुराविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने सुनीलसह तिघांनाही अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतरही आपण त्या गावचेच नसल्याचा आव आता सुनील आणि त्याचा मुलगा पार्थ यांनी आणला आहे. त्याने आणखी अशा किती जणांना गंडा घातला आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
----------------
पोलिसांचे आवाहन
प्लॉटवर पुनर्विकास करून देतो, मोठ्या कंपनीचे शेअर्स स्वस्तामध्ये मिळवून देतो, अशी प्रलोभने दाखवून सुनील सोनपुरा याने आणखीही कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केले आहे.