मोबाइल चोरीसाठी रेल्वे प्रवाशावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक, ठाणे रेल्वे पोलिसांची कारवाई; चौथ्या आरोपीचा शोध सुरू
By जितेंद्र कालेकर | Published: October 13, 2022 09:33 PM2022-10-13T21:33:45+5:302022-10-13T21:34:20+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील १६ वर्षीय तक्रारदार हा ११ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ ते ३.१० वाजण्याच्या सुमारास ऐरोली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाहेरील पश्चिमेकडील तिकीट खिडकीजवळ उभा होता. त्याचवेळी तीन जाणांना त्याला धक्काबुक्की करून त्याचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला.
ठाणे : मोबाइलची जबरी चोरी करण्यासाठी रेल्वे प्रवाशावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी गुरुवारी दिली. त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आकाश भावे उर्फ आक्या, आशिष रामनयन यादव उर्फ पलट्या (१८), रमेश सागरे उर्फ रितीक (१९, रा. रबाळे, नवी मुंबई) अशी अटक आरोपीचा नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील १६ वर्षीय तक्रारदार हा ११ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ ते ३.१० वाजण्याच्या सुमारास ऐरोली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाहेरील पश्चिमेकडील तिकीट खिडकीजवळ उभा होता. त्याचवेळी तीन जाणांना त्याला धक्काबुक्की करून त्याचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रतिकार केल्यावर मोबाइल हस्तगत करण्याकरिता त्याच्या डाव्या बरगडीवर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याचा मोबाइल खेचून तेथून पलायन केले.
ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार विजयकुमार बागले, चंद्रकांत चौधरी, पोलीस नाईक क्षितीज कोयंडे, अंमलदार मिरजावेद नदाफ, राकेश गोसावी, पीयूष पाटील आणि अजय निकाळजे यांनी या चोरीचा तपास केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रणा आणि गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे १३ आॅक्टोबर रोजी नवी मुंबईतील रबाळे येथील दिवा आंबेडकर नगर भागातून आरोपींना अटक केली आहे. चौकशीमध्ये त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या कृष्णा या अन्य एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.