काशीगाव भागात गाईची कत्तल करणाऱ्या तिघांना अटक; १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
By धीरज परब | Published: April 11, 2024 08:48 PM2024-04-11T20:48:17+5:302024-04-11T20:48:21+5:30
तक्रार मिळाल्या नंतर काशीगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे व राणा परदेशी सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .
मीरारोड - काशीगाव भागातील डोंगर जवळ एका गायीची कत्तल केल्या प्रकरणी स्थानिक रहिवाश्यांच्या तक्रारी नंतर काशीगाव पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना १४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे .
येथील मीनाक्षी नगर भागातील डोंगर जवळ त्याच भागात राहणारा नईम सैफ कुरेशी (३३ ) ह्याने मध्यरात्रीच्या सुमारास एका टेम्पोतून गाय आणल्याचे स्थानिक रहिवाश्याना दिसून अणे . दोन रहिवाशांनी त्याच्यावर पाळत ठेवली असता बुधवारी पहाटे तो गाय कापत असल्याचे समजतात रहिवाशांनी ११२ क्रमांकावर कॉल करून तक्रार केली .
तक्रार मिळाल्या नंतर काशीगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे व राणा परदेशी सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . मात्र त्या आधीच आरोपींनी गाईची कत्तल केली असल्याचे आढळून आले . त्यावेळी नईम ह्याला पकडण्यात आले परंतु त्याचे दोघे साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले .
पोलिसांनी या प्रकरणी नईमची कसून चौकशी तसेच तपास करत पळून गेलेल्या मौसीन महेबूब पाशा (वय २४ वर्ष ) रा. संघवी एम्पायर बिल्डिंग, हैदरी चौक, नयानगर, मीरारोड व छंगुर हिरालाल नूर ( वय ३२ वर्ष ) रा. मीनाक्षी नगर, काशीगाव ह्या दोघांना देखील अटक करण्यात आली . याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता , महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी हे पुढील तपास करत आहेत.