स्वस्तात कपड्यांची जाहिरात करुन ऑनलाईन फ्रॉड करणारे तिघे अटकेत
By अजित मांडके | Published: March 30, 2024 08:27 PM2024-03-30T20:27:09+5:302024-03-30T20:27:26+5:30
१२०० ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड.
ठाणे : इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वस्तात कपड्यांची जाहीरात करुन आॅनलाईन फ्रॉड करणाºया तीघांना ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हे तिघेही १९ ते २३ वर्षे वयोगटातील असून त्यांनी आतापर्यंत सुमारे १२०० जणांची आर्थिक फसवणुक केली असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या तीघांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी सुफीयान शफीक खान (२३) रा. जास्मीन पार्क मुंब्रा, फुरकान रिजवान खान (२०) रा. मुंब्रा आणि कामरान इस्माईल शेख (१९) रा. चारमीनार लॉन्स जवळ, मुंब्रा यांना अटक करण्यात आले आहे. आॅनलाईन फ्रॉडचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यासंदर्भात ठाणे पोलिसांनी पावले उचलली होती. त्यात २० मार्च रोजी मुंब्रा येथील एका बातमीदार हा परिमंडळ १ ठाणे कार्यालयात येऊन माहिती दिली होती. त्यानुसार काही इसम हे मागील दोन ते अडीच वर्षापासून फेक इन्स्टाग्राम आॅनलाईन अकाऊंट बनवून त्याद्वारे कपड्यांची स्टेट्स द्वारे जाहीरात करीत आहेत. त्यांचे अकाऊंट वरील स्टेटस पाहिले असता ते ग्राहकांना कपडे आवडल्यास इन्स्टाग्राम अंकाऊंट वरील व्हॉट्सअॅप लिंक वर जाऊन त्यांना केवळ हाय असा मेसेज केल्यास तत्काळ प्रतिउत्तर देतात व त्यांच्याकडे मेसेजद्वारे त्याचे पूर्ण डिटेल ज्यामध्ये नाव, मोबाईल क्रमांक, कपड्यांची साईज अशी माहिती मागतात व त्यामध्ये नो कॅश आॅन डिलीव्हरी असे नमुद करुन पुढील ७ ते १२ दिवसात बुकींग केलेला माल न मिळाल्यास पैसे परत केले जातील असे लिहून मेसेज फॉरवर्ड करतात. पसंतीत पडलेल्या कपड्यांच्या अमिषाला बळी पडून काही ग्राहक हे पैसे पाठवत होते. परंतु कपडे न मिळाल्याने ते फोन किंवा मेसेज केले असता, त्यांचा नंबर तत्काळ ब्लॉक केला जात होता. अशा पध्दतीने ते ग्राहकांची फसवणुक करीत असल्याची माहिती पुढे आली होती.
त्यानुसार बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसमांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर संपर्क करुन त्याची खात्री केली. त्यानंतर त्यांचे लोकेशन मागवून त्यांच्या मुंब्रा येथील राहत्या घरी छापा टाकला असता, ते त्याठिकाणी आढळून आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, तसेच त्यांचे मोबाइल तपासले असता, त्यात १ हजार ते १२०० नंबर त्यांनी ब्लॉक केल्याचे आढळून आले आहे. त्यातही हे तीघे बँक अकाऊंट देखील दुसºयाच व्यक्तीचा दिला जात होता. त्याच्या खात्यातून ते पैसे वळते करत असते, तसेच संबधींताला देखील काही हिस्सा देत होते. अशी माहिती देखील तपासात पुढे आली आहे. तर ब्लॉक केलेल्या यादीतील एक नंबर हा कळवा भागातील राहणाºया ग्राहकाचा आढळून आला. त्याला बोलावून विचारणा केली असता, आपली फसवणुक झाल्याचे त्याने सांगितले. तर अशा प्रकारच्या आॅनलाईन अमिषांना बळी पडू नका असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.